Join us

Ramayan: साई पल्लवी साकारणार ‘सीता’, रणबीर कपूर साकारणार ‘राम’? सुरू झाली बिग प्रोजेक्टची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 6:30 PM

Sai Pallavi, Ranbir Kapoor : होय, चर्चा खरी मानाल तर साई लवकर बॉलिवूड डेब्यू करू शकते. बॉलिवूडचा हँडसम रणबीर कपूरसोबत साई दिसू शकते. ही बातमी समोर येताच, साईचे चाहते क्रेझी झाले आहेत.

साई पल्लवी ( Sai Pallavi ) ही दक्षिणेची लोकप्रिय अभिनेत्री. तिची वेगळी ओळख करून देण्याची तशीही गरज नाही. केवळ पैशांना महत्त्व देणाऱ्या आणि तत्त्वांशी काडीचाही संबंध नसणाऱ्या कलाकारांच्या भाऊगर्दीत साई पल्लवी वेगळी ठरते. दोन कोटींची जाहिरात फक्त तिचं नाकारू शकते. होय, काही वर्षांआधी साईला एका फेअरनेस क्रिमची जाहिरात ऑफर झाली होती. काही मिनिटांच्या या जाहिरातीसाठी तिला 2 कोटी मिळणार होते. पण साईने ही ऑफर धुडकावून लावली. केवळ पैशांसाठी फेअरनेस क्रिमची जाहिरात करण्यास तिने नकार दिला.

मी कधीच सौंदर्य प्रसाधनांची जाहिरात करत नाही. मला ते मान्यच नाही. तुम्ही जसे असाल तसे स्वत:ला स्वीकारा, जग तुम्हाला आपोआप स्वीकारले, असं ती म्हणते.याच सर्वांच्या आवडत्या साईबद्दल एक फक्कड बातमी आहे. होय, चर्चा खरी मानाल तर साई लवकर बॉलिवूड डेब्यू करू शकते. बॉलिवूडचा हँडसम रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) साई दिसू शकते. ही बातमी समोर येताच, साईचे चाहते क्रेझी झाले आहेत.

रिपोर्टनुसार, बॉलिवूड निर्माता मधू मंटेना यांनी आपल्या रामायणावर (Ramayan)  सिनेमासाठी साई पल्लवीला विचारणा केली आहे. साईने या चित्रपटाला होकार दिलाच तर ती या चित्रपटात सीतेची भूमिका साकारताना दिसेल. तर रणबीर कपूर प्रभु रामाची भूमिका जिवंत करेल.

रामायणावर आधारित ‘आदिपुरूष’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतो आहे. यात साऊथ सुपरस्टार प्रभु रामचंद्राच्या भूमिकेत आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन सीतेच्या भूमिकेत आहे. सैफ अली खान या चित्रपटात रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता याच कथेवरचा आणखी एक सिनेमा मधु मंटेना साकारू इच्छित आहेत. आता त्यांचे हे प्रयत्न किती यशस्वी होतात ते बघूच.

साई पल्लवीबद्दल सांगायचं तर   2015 मध्ये प्रेमम या मल्याळम चित्रपटातून तिने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिलं. पहिल्या चित्रपटानंतर साई एका रात्रीत स्टार झाली. पण हे स्टारडम डोक्यात जाऊ न देता तिने तिचे एमबीबीएस पूर्ण केलं. म्हणजे ती डॉक्टर बनली.यानंतर आलेले अथिरन, मारी 2 हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लवीचं पूर्ण नाव साई पल्लवी सेंथामराय आहे. साई पल्लवी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे.  

टॅग्स :साई पल्लवीरणबीर कपूररामायणबॉलिवूड