मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने (Saie Tamhankar) आज हिंदी इंडस्ट्रीतही नाव कमावलं आहे . बोल्ड, बिंधास्त अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. काल सईने 38 वा वाढदिवस साजरा केला. सईने छोट्या पडद्यावरुन अभिनयात क्षेत्रात एन्ट्री घेतली होती. 'या गोजिरवाण्या घरात' मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. नंतर तिने काही मराठी, हिंदी मालिका केल्या. तसंच ती 'सनई चौघडे' या मराठी सिनेमातही झळकली. या सिनेमामुळे तिला बरीच लोकप्रियता मिळाली. त्याचवर्षी सईने एका हिंदी सिनेमातही काम केले होते. कोणता होता तो सिनेमा?
सई ताम्हणकरने सध्या मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीही गाजवत आहे. सिनेमा असो किंवा वेबसीरिज तिचा बोलबाला आहे. तिच्या 'मिमी' सिनेमातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. सईने 'गजनी' सिनेमातून हिंदीत डेब्यू केला असंच अनेकांना वाटतं. पण सईचा पहिला हिंदी सिनेमा होता सुभाष घईंचा 'ब्लॅक अँड व्हाईट'. 2008 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात सईची लहान भूमिका होती. अनिल कपूर सिनेमाचा हिरो होता तर सोबत शेफाली शहा, अनुराग सिन्हा, आदिती शर्मा यांचीही भूमिका होती. सईचा 'सनई चौघडे' हा सिनेमाही त्याचवर्षी आला होता.
सई ताम्हणकर मूळची सांगलीची आहे. इतके वर्ष मुंबईत राहूनही ती आजही मनातून सांगलीकर आहे. लवकरच ती नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग' सिनेमात झळकणार आहे. तसंच आगामी एका सिनेमात ती इम्रान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.