Join us

सैफ अली खान रिक्षातून रुग्णालयात का गेला? तैमुरची नॅनी म्हणाली, "इमारतीत ड्रायव्हरसाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:50 IST

सैफ आणि करीना स्वत: ड्राईव्ह करु शकत होते का? काय म्हणाली तैमुरची नॅनी

सैफ अली खानवर (Saif Ali Khan) झालेला हल्ल्याची गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चा आहे. मध्यरात्री सैफच्या घरात चक्क चोर घुसला आणि त्याने सैफवर चाकूहल्ला केला. यानंतर गंभीर जखमी झालेल्या सैफला चक्क रिक्षातून लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं होतं. इतका मओठा सेलिब्रिटी रिक्षातून का गेला असा प्रश्न अनेकांना पडला होता. तैमुर लहान असताना त्याची देखभाल करणारी नॅनी ललिता डिसिल्व्हा यांनी एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत ललिता डिसिल्व्हा म्हणाल्या, "सैफवर हल्ला झाल्यानंतर तो खूप गंभीर अवस्थेत होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेणं गरजेचं होतं. सैफने त्याच्याकडे काम करणाऱ्यांसाठी जवळच राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे जेव्हा काही कामच नसतं तेव्हा तो त्यांना त्यांच्या घरी पाठवतो. आता रात्री कुठे जायचं नसल्याने त्याने ड्रायव्हर्सना घरी पाठवलं होतं. तसंच ड्रायव्हर्सने इमारतीतच राहावं अशी कोणती व्यवस्थाही तिथे नाही. म्हणूनच त्यांना जवळच खोल्या दिल्या गेल्या आहेत. ते त्यांच्या कुटुंबासोबत तिथे राहतात."

त्या पुढे म्हणाल्या, "सैफ आणि करीना सुद्धा कार चालवू शकतात. पण ती वेळच अशी होती की कोणाचेही हात थरथर कापतील. सैफ तर गाडी चालवण्याच्या अवस्थेतही नव्हता. जखमी असताना तो कसं काय ड्राईव्ह करु शकणार होता?"

सैफ अली खानवर १५ जानेवारी रोजी मध्यरात्री हल्ला झाला होता. मोहम्मद शरीफुल हा आरोपी त्याच्या घरात घुसला होता. तो थेट तैमुर आणि जेहच्या खोलीत शिरला होता. मुलांच्या नॅनींचा आरडाओरडा ऐकल्यानंतर सैफ धावत खोलीत आला. त्याने आरोपीला हटकलं तेव्हा आरोपीने त्याच्यावर थेट चाकूहल्ला केला.

टॅग्स :सैफ अली खान बॉलिवूड