Join us

सैफ अली खानने वादानंतर मागितली जाहीर माफी, रावणाबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 9:15 AM

सोशल मीडियावर हा सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी होऊ लागली होती. मात्र, सैफने आता यावरून माफी मागितली आहे. 

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान नुकताच एका मुलाखतीत त्याच्या आगामी 'आदिपुरूष' सिनेमातील रावणाच्या रोलबाबत बोलला होता. पण त्याने आपल्या रावणाच्या भूमिकेबाबत केलेलं वक्तव्य अनेकांना आवडलं नाही आणि यामुळेच वाद पेटला. अनेक राजकीय नेत्यांना यावर नाराजी व्यक्त केली आणि मग यावरून वाद पेटला. नंतर सोशल मीडियावर हा सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी होऊ लागली होती. मात्र, सैफने आता यावरून माफी मागितली आहे. 

सैफ अली खानने माफी मागितली

सैफ अली खान म्हणाला की, 'मला असं समजलं की, माझ्या मुलाखती दरम्यान मी केलेल्या वक्तव्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. असं काही करण्याचा माझा उद्देश नव्हता आणि असं काही मला करायचं सुद्धा नाही. मी माझं वक्तव्य मागे घेतो आणि सर्वांची माफी मागतो. भगवान राम नेहमीच माझ्यासाठी हिरो राहिले आहेत. आदिपुरूष वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे. आमची संपूर्ण टीम ही महान कथा पडद्यावर साकारण्यासाठी मेहनत घेत आहे'. (रावण खलनायक नव्हता, म्हणणाऱ्या सैफ अली खानवर भडकले राम कदम; म्हणाले...)

काय म्हणाला होता सैफ?

अलीकडेच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खान ‘आदिपुरुष’ मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलता होता. ‘आदिपुरुष’या चित्रपटात लंकेशची व्यक्तिरेखा वाईट नसून मनोरंजक आहे. आम्ही ती अतिशय मनोरंजक पद्धतीने सादर करणार आहोत. रावणाने केलेल्या सीता हरणालाही आम्ही न्यायसंगत दाखवणार आहोत. रावणाला आपण आजपर्यंत खलनायकाच्या भूमिकेत पाहिले. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रामासोबतचे त्याचे युद्ध ही सूडाची कहाणी असल्याचे आम्ही दाखवणार आहोत. जे लक्ष्मणाने रावणाची बहिण शुर्पणखाचे नाक कापल्यामुळे सुरू झाले होते, असे सैफ या मुलाखतीत म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉयकॉट आदिपुरूष, वेकअप ओमराऊत असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. अनेकांनी सैफला सिनेमातून काढून टाकण्याची मागणीही केली आहे.

राम कदम सैफवर भडकले

सैफच्या या वक्तव्याचा राम कदम यांनी तिखट शब्दांत समाचार घेतला. ‘आदिपुरूष या सिनेमात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारतो आहे. रावणाच्या भूमिकेला हिरोसारखे निभवेल, असे ते म्हणत आहेत. लक्ष्मणाने रावणाच्या बहिणेचे नाक कापले त्यामुळे रावणाने सीतामातेचे अपहरण केले, प्रभु रामचंद्रासोबत युद्ध केले, असे सैफ म्हणत आहेत. सैफ रावणाच्या दृष्कृत्याला न्याय देण्याची भाषा करत असतील त्याचे समर्थन कसे होईल?  प्रभू रामचंद्रांनी धर्म स्थापित केला, आमची आस्था आणि श्रद्धा आहे. राम आणि रावणाची लढाई ही धर्म -अधर्म यांची लढाई आहे. आता ते अधर्माला योग्य ठरवत आहेत. निर्माता आणि दिग्दर्शकाने हिंदूंच्या आस्थांचा आदर करत सिनेमा बनवावा. ओम राऊत यांनी याआधी ‘तान्हाजी’ सिनेमा साकारला होता.  त्यामध्ये ज्याप्रकारे हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील मराठ्यांची अस्मिता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे या सिनेमातही त्यांना हिंदूंच्या आस्था आणि श्रद्धेचा सन्मान त्यांना करावा लागेल. हिंदू भावना दुखावल्या गेल्यास तेआम्ही  सहन करणार नाही,’ असे राम कदम यांनी  पोस्टमध्ये लिहिले आहे. 

टॅग्स :सैफ अली खान बॉलिवूडआदिपुरूष