Join us

सैफ हल्ला प्रकरणात सुनावणी, आरोपीचा जामीन अर्ज नाकारण्याची पोलिसांची कोर्टाला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 09:04 IST

आरोपी बांगलादेशला पळून जाईल..., पोलिस कोर्टात काय म्हणाले?

अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) काही महिन्यांपूर्वीच जीवघेणा हल्ला झाला होता. मध्यरात्री त्याच्या घरातच घुसलेल्या चोराने त्याच्यावर चाकूहल्ला केला. यामध्ये सैफ गंभीर जमखी झाला होता आणि त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर तिकडे अनेक दिवस पोलिस आरोपीला शोधत होते. अखेर मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला पकडण्यात पोलिसांना यश आलं. बांगलादेशमधून आलेला हा आरोपी तेव्हापासून अटकेत आहे. काही दिवसांपूर्वी शरीफुलने जामिनासाठी अर्ज केला होता. पोलिसांनी शरीफूलच्या जामीन अर्जाला विरोध केला असून तो नाकारण्याची कोर्टाला विनंती केली आहे.

सैफ अली खान हल्ला प्रकरणात नुकतीच कोर्टात सुनावणी झाली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा बांगलादेशी नागरिक आहे आणि भारतात बेकायदेशीरपणे राहत आहे. जर आरोपीची जामीनावर सुटका केली तर तो बांगलादेशला पळून जाऊ शकतो आणि तपासात अडथळे आणू शकतो. तसंच यानंतरही तो पुन्हा काही गंभीर गुन्हा करु शकतो. त्याने सैफवर केलेला हल्ला अत्यंत गंभीर प्रकृतीचा गुन्हा असून त्याच्याविरोधात ठोस पुरावे उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता पोलिसांनी कोर्टाला आरोपीचा जामीन अर्ज नाकारण्याची विनंती केली जेणेकरुन याचा तपास योग्य दिशेने सुरु राहील.

या प्रकरणी आता पुढील सुनावणी ९ एप्रिल रोजी होणार आहे. या दिवशी न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे. आरोपी शरीफुलने २९ मार्च रोजी कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. आपण निर्दोष असून आपल्याविरोधात खोटी कोस करण्यात आल्याचं त्याने अर्जात सांगितलं. 

सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या पहाटे हल्ला झाला होता. आरोपी शरीफुल त्याच्या मुलांच्या खोलीत घुसला होता. तिथे तो जेहजवळ उभा होता. जेहला ओलीस ठेवून पैसे उकळण्याचा त्याचा कट होता. तेव्हाच सैफ तिथे आला आणि आरोपीने सैफवर हल्ला केला. नंतर तो तिथून आला तसा पळून गेला.  

टॅग्स :सैफ अली खान बॉलिवूडन्यायालयमुंबई पोलीस