अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणात मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की, अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाने गरिबीमुळे हे कृत्य केलं आहे. त्याला नोकरी नव्हती. पोलिसांनी हल्लेखोराला कसं पकडलं याबाबतची महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीफुलने एकदा चहासाठी ६ रुपये आणि बुर्जीपाव खाण्यासाठी ६० रुपये दिले होते, ज्याद्वारे त्याला ट्रॅक करण्यात आलं.
शरीफुलने पोलिसांना सांगितलं की, तो ठाण्यातील एका रेस्टॉरंटमध्ये काम करायचा, परंतु त्याची नोकरी १५ डिसेंबर २०२४ रोजी नोकरी गेली. जितेंद्र पांडे नावाच्या व्यक्तीच्या एजन्सीमध्ये तो काम करत होता. जितेंद्र पांडे यांनी पोलिसांना त्याचं वरळीतील लोकेशन आणि फोन नंबर दिला. आरोपीने ई-वॉलेटद्वारे वरळीमध्ये एक कप चहासाठी ६ रुपये दिले होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आरोपीचं शेवटचं लोकेशन ठाण्यातील लेबर कॅम्प होतं. १८ जानेवारी रोजी त्याने बुर्जीपाव खाण्यासाठी ६० रुपयांचं पेमेंट केलं होतं. एवढंच नाही तर पोलिसांनी शरीफुलची चौकशी केली तेव्हा तो सैफ अली खानचा फॅन असल्याचं समोर आलं. सैफवर हल्ला करण्यापूर्वी त्याने शाहरुख खानच्या वांद्रे येथील बंगला मन्नतच्या भिंतीवर चढून सुपरस्टारला पाहण्याचा प्रयत्नही केला होता.
पोलिसांनी असंही सांगितलं की, शरीफुलचे मित्र आणि नातेवाईकही तो शाहरुख खानसारखा दिसतो असं म्हणायचे. पोलिसांनी शरीफुलचा फोन, टोपी, टॉवेल आणि गुन्ह्यानंतर त्याने बदललेला शर्ट देखील जप्त केला आहे. जप्त केलेल्या सर्व वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत.
शरीफुलने सांगितलं की, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ठाण्यातील रेस्टॉरंटमध्ये काम सुरू करण्यापूर्वी तो वरळीतील एका रेस्टॉरंटमध्ये काम करायचा. त्या रेस्टॉरंटमध्ये त्याला १३ हजार रुपये मिळायचे. तो त्याच्या आईच्या उपचारासाठी दरमहा १२ हजार रुपये बांगलादेशला पाठवत असे आणि फक्त एक हजार रुपये स्वतःकडे ठेवत असे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, रेस्टॉरंट मॅनेजरने त्याला चोरी करताना पकडले, त्यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. डिसेंबरमध्ये नोकरी गेल्यानंतर, त्याने चोरी करण्याचा प्लॅन केला.
आरोपी मेघालयातील भारत-बांगलादेश सीमेवरील दावकी नदी ओलांडून नोकरीसाठी भारतात झाला होता. त्याने एका एजंटला १०,००० रुपये दिले होते जो त्याला आसामला घेऊन गेला. यानंतर तो कोलकाताला पोहोचला आणि तिथून मुंबईला जाणारी ट्रेन पकडली आणि इथे आला. अनेक दिवस रस्त्यावर भटकल्यानंतर, एखाद्या व्यक्तीद्वारे तो जितेंद्र पांडे यांच्या संपर्कात आला, ज्यांनी त्याला रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळवून दिली.