Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर १६ जानेवारीला प्राणघातक हल्ला झाला होता. सैफच्या घरात घुसलेल्या हल्लेखोराने अभिनेत्यावर चाकूने वार केले होते. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्यावर सर्जरीदेखील झाली होती. आता सैफचे मेडिकल रिपोर्ट समोर आले आहेत.
सैफच्या हल्लेखोर प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. आता त्याच्या मेडिकल रिपोर्टमधूनही मोठा खुलासा झाला आहे. मेडिकल रिपोर्टनुसार, सैफच्या शरीरावर पाच ठिकाणी जखमा होत्या. पाठ, मनगट, मान, खांदा आणि कोपर या ठिकाणी सैफ जखमी झाला होता. त्याच्या पाठीवर डाव्या बाजूला जवळपास ०.५ ते १ सेमी इतकी जखम होती. तर डाव्या मनगटावर ५-१० सेमीची जखम झाली होती. सैफच्या मानेवर उजव्या बाजूला १०-१५ सेमी तर उजव्या खांद्याला ३-५ सेमी इतकी जखम होती. उजव्या कोपरावर ५ सेमीची जखम असल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
सैफला हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन गेलं, याचा खुलासाही मेडिकल रिपोर्टमध्ये झाला आहे. सैफचा मॅनेजर आणि जवळचा मित्र असलेले अफसर झैदी सैफला सकाळी ४.११ वाजता लीलावती हॉस्पिटलला घेऊन गेले होते. हॉस्पिटलमधील सगळ्या औपचारिकता देखील झैदी यांनीच पूर्ण केल्या होत्या, असं रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे.
दरम्यान, हल्ला झाल्यानंतर सैफवर सर्जरी करण्यात आली होती. त्याच्या पाठीतून २.५ इंचाचा चाकूचा तुकडा काढल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. सर्जरीनंतर ५ दिवसांनी सैफला घरी सोडण्यात आलं होतं. आता सैफची प्रकृती स्थिर आहे.