Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी(१५ जानेवारी) रात्री चाकूने जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैफ अली खानवर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. अभिनेत्यावर हल्ला झाल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.
आता या प्रकरणात पाकिस्तानी नेत्यानेही एन्ट्री घेतली आहे. सैफ अली खान प्रकरणावर पाकिस्तानचे नेते फवाद हुसैन यांनी ट्वीट केलं आहे. "अभिनेत्यावर हल्लेखोराने सहा वेळा वार केला. हिंदू महासभा झाल्यापासून मुस्लिम अभिनेत्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानने त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवायला हवा", असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
हल्लेखोराने सैफ अली खानच्या घरात मागच्या बाजूने प्रवेश केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या मदतनीसला भेटण्यासाठी हल्लेखोर घरात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सैफवर हल्ला करण्याअगोदर हल्लेखोर सैफ-करीनाचा मुलगा तैमुरच्या खोलीकडे जात होता. हल्लेखोराला तैमुरच्या खोलीच्या दिशेने जाताना सैफच्या घरातील मोलकरणीने पाहिलं आणि आरडाओरडा सुरू केला. मोलकरणीने आरडाओरडा केल्यानंतर बाजूच्याच खोलीत झोपलेला सैफ अली खान जागा झाला आणि बाहेर आला. सैफने हल्लेखोर आणि मोरकणीला पाहिलं आणि हल्लेखोरला रोखण्यासाठी तो धावला. या झटापटीत हल्लेखोराने सैफवर चाकूने ६ वार केले. यात सैफ गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.