Join us

सैफ अली खान सांगतोय एकेकाळी लोक माझी नक्कल करायचे

By प्राजक्ता चिटणीस | Published: October 24, 2018 5:11 PM

गेल्या अनेक वर्षांत फिल्म इंडस्ट्री खूप बदलली आहे असे सैफ अली खानचे मत आहे. तो लवकरच बाजार या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सैफ अली खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये एकाहून एक सरस भूमिका साकारत आहे. त्याचा बाजार हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटात तो एका गुजराती माणसाची व्यक्तिरेखा साकारत आहे. गेल्या अनेक वर्षांत फिल्म इंडस्ट्री खूप बदलली आहे असे त्याचे मत आहे. त्याच्या चित्रपटाबाबत आणि एकंदरीत त्याच्या करियरविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

गेल्या काही वर्षांपासून तू खूपच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत आहे, यामागचे कारण काय?मी चित्रपटसृष्टीत माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली, त्यावेळी कलाकार त्याच त्याच प्रकारची भूमिका साकारत असे. पण आता चित्रपटसृष्टी खूप बदलली आहे. चित्रपटांमध्ये अनेक प्रयोग केले जात आहे, कथा वेगवेगळ्या प्रकारच्या येत आहेत. दिग्दर्शक, निर्माते वेगळ्या प्रकारे विचार करत आहेत. या सगळ्यामुळे आम्हा कलाकारांना देखील खूप चांगल्या भूमिका साकारायला मिळत आहेत. चित्रपटसृष्टीतील हा बदल लगान या चित्रपटानंतर झाला असे मला वाटते. प्रत्येक व्यक्तीची एक बोलण्याची वेगळी ढब असते, त्याचा आवाज वेगळा असतो या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता डबिंगवर देखील प्रचंड मेहनत घेतली जात आहे. पूर्वी तर माझ्या संवाद म्हणण्याच्या स्टाईलची लोक नक्कल देखील करायचे. पण आता लोक माझ्या भूमिकांच्या, माझ्या अभिनयाच्या प्रेमात आहेत.

बाजार या चित्रपटातील भूमिकेवर कशाप्रकारे मेहनत घेतलीस?बाजार या चित्रपटात मी एका गुजराती माणसाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी मी गुजराती भाषेचा अभ्यास केला. इंटरनेटवर मी या भाषांच्या कविता ऐकत असे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी घरी या कविता म्हणताना तैमूरदेखील आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहात असे. हा चित्रपट स्टॉक एक्सचेंवर आधारित असल्याने मी या विषयावर आधारित काही चित्रपट देखील पाहिले आणि विशेष म्हणजे या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण मुंबईतील खऱ्या लोकेशन्सवर करण्यात आले असल्याने या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा अनुभव खूपच छान होता.

एक स्टार किड म्हणून तुझ्यावर सुरुवातीपासून किती दडपण होते आणि तू साराला चित्रपटसृष्टीत येण्याआधी काही मार्गदर्शन केले आहेस का?तुम्ही ज्यावेळी स्टार किड असता, त्यावेळी नकळत तुमच्यावर दडपण येते. आमच्यासाठी यश आणि अपयशाच्या व्याख्या इतरांपेक्षा खूप वेगळ्या असतात. कारण तुम्हाला यश मिळाले तर इतक्या मोठ्या कलाकाराचा मुलगा असल्याने यश मिळणारच असे लोकांचे म्हणणे असते तर दुसरीकडे अपयश मिळाल्यास लोक आम्हाला शिव्या देखील घालतात. मी अभिनयक्षेत्रात आलो त्यावेळी अभिनय कसा करायचा हे मला माहीत नव्हते. पण आताची पिढी ही अभिनयाच्या बाबतीत अधिक सतर्क आणि हुशार आहे. त्यामुळे मी तिला अभिनयाविषयी मार्गदर्शन न करता केवळ एवढेच सांगितले आहे की, एक कलाकार म्हणून जगाकडे पाहा, चांगल्या गोष्टी आत्मसात कर... सगळ्या गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहा... आणि इंडस्टीमधील कोणत्याही राजकारणात पडू नकोस.

बॉलिवूडमध्ये सध्या मीटूचे वादळ आले आहे, त्याबाबत तू काय सांगशील?कोणत्याही महिलेवर कोत्याही प्रकारचा अत्याचार होणे हे चुकीचेच आहे. महिलांना सतवणे, त्यांच्यावर उगचच कमेंट्स करणे हे प्रकार मला कधीच आवडत नाहीत. त्यामुळे मीटू या कॅम्पेनला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. आज महिला मोठ्या संख्येने बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे कामाचे स्थान हे सुरक्षितच असले पाहिजे. तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत त्यांनी न घाबरता बोलणे गरजेचे आहे. 

टॅग्स :सैफ अली खान तैमुरसारा अली खान