अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) सध्या चर्चेत आहे. घरात घुसून सैफवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. चाकू हल्ला प्रकरणात तपास वेगाने पुढे सरकतोय. तर दुसरीकडे सैफ ही त्याच्या आयुष्यात व्यस्त आहे. त्याचा नवा 'ज्वेल थीफ' हा चित्रपट येतोय. विशेष म्हणजेय या चित्रपटात तो स्वत: चोर आहे. 'ज्वेल थीफ' (Jewel Thief) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकतंच पार पडला. या सोहळ्यात सैफसोबत एक मजेशीर घटना घडली. त्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'ज्वेल थीफ' सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात सैफ हजर झाला होता. या कार्यक्रमात सैफ खुर्चीवर बसताच जोरात ओरडला. सैफला काय झालं, हे कुणालाच कळालं नाही. तेवढ्यात सैफन मागच्या खिशातील हिरा काढल्यानंतर उलगडा झाला. तर झालं असं की ट्रेलर लाँच कार्यक्रमात सर्व स्टारकास्टच्या हाती एक-एक लाल रंगाचा हिरा देण्यात आला होता. सर्वांनी स्टेजवर हिरा दाखवत पोझ दिल्या. यावेळी फोटो काढून झाल्यानंतर सैफनं तो हिरा मागच्या खिशात ठेवला आणि तो विसरून गेला. पण, जेव्हा तो खुर्चीवर बसला, तेव्हा खिशात असलेला हिरा त्याला टोचला. यानंतर सैफने स्टाफकडे जमा केला. आपल्या कृतीवर सैफही हसताना दिसून आला. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सैफचा 'ज्वेल थीफ' सिनेमा हा २५ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सैफ अली खानसोबत या चित्रपटात जयदीप अहलावत, कुणाल कपूर आणि निकिता दत्ता आहेत. हा चित्रपट एका चोरीवर आधारित असून दिग्दर्शन कोकी गुलाटी आणि रॉबी ग्रेवाल यांनी केले आहे. मार्फ्लिक्स पिक्चर्सच्या बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आधुनिक काळातील चोरी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.