Join us  

'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 11:25 AM

सैफला 'आदिपुरुष' सिनेमामुळे मात्र ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. ओम राऊतच्या या सिनेमात त्याने रावणाची भूमिका साकारली होती. आता सैफने  पहिल्यांदाच 'आदिपुरुष'वर झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. 

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान कायमच चर्चेत असतो. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या सैफला 'आदिपुरुष' सिनेमामुळे मात्र ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. ओम राऊतच्या या सिनेमात त्याने रावणाची भूमिका साकारली होती. परंतु, यामुळे सैफला ट्रोल केलं गेलं होतं. हिंदू भावना दुखावल्याचा आरोपही या सिनेमावर करण्यात आला होता. पण, याबाबत मात्र सैफने मौन बाळगणं पसंत केलं होतं. आता सैफने  पहिल्यांदाच 'आदिपुरुष'वर झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. 

सैफ त्याच्या आगामी 'देवरा पार्ट १' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात सैफबरोबर ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत सैफने आदिपुरुषबाबत भाष्य केलं. "एवढ्या प्रमाणात ट्रोलिंग होईल असं वाटलं नव्हतं. कोर्टाने एका केसमध्ये निर्णय देतना असं सांगितलं होतं की एक कलाकार स्क्रीनवर जे काही बोलतो त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या अभिनेत्याची असते", असं सैफ 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. 

पुढे तो म्हणाला, " अनेक लोकांना त्यांना जे वाटतं ते बोलता आणि करता येत नाही. त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे. नाहीतर आपण अडचणीत येऊ शकतो. धर्म, राजकारण या गोष्टींबाबत बोलताना मात्र आपण नेहमीच काळजीपूर्वक शब्द वापरले पाहिजेत. धर्मापासून लांबच राहिलेलं बरं. आपण इथे त्याबद्दल वाद निर्माण करायला आलो नाही आहोत". सैफच्या तांडव या वेब सीरिजमुळेही त्याला ट्रोल केलं गेलं होतं. आपल्या कामातून या गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण मिळाल्याचं सैफने म्हटलं आहे. 

टॅग्स :सैफ अली खान आदिपुरूषसेलिब्रिटी