दिवंगत अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. श्वास घेण्यास अडचण आणि छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तूर्तास सायरा यांच्या उपचार करणारे डॉ. नितीन गोखले यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सायरा बानो यांचा लेफ्ट वेंट्रिकुलर निकामी झाल्याचं कळतंय. त्यामुळे लवकरच त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार आहे . तथापि सायरा यांच्या प्रकृतीत सुधार होतोय. आज त्यांना आयसीयूमधून नॉर्मल वार्डात शिफ्ट केलं जाणार आहे.
गोखले यांनी सांगितल्यानुसार, अँजिओग्राफी काही दिवसानंतर केली जाईल. त्याआधी सायरा यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अँजिओग्राफीसाठी त्यांना पुन्हा रूग्णालयात भरती व्हावं लागेल. मात्र यासाठी त्यांचा डायबिटीज कंट्रोल करावा लागेल.दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा कोलमडल्या आहेत. त्या ना कोणाला भेटतं, ना कोणाशी बोलतं. याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला आहे. चार दिवसांपूर्वी जेवणानंतर त्यांची प्रकृती बिघडली. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.
सायरा बानो 76 वर्षांच्या आहेत. मात्र त्यांनी आपले वाढते वयाची कधीच पर्वा केली नाही. कारण त्यांना दिलीप साहेबांना सांभाळायचे होते. दिलीप कुमार यांचं दोन महिन्यांपूर्वीच निधन झालं आहे. निधनानंतर त्या एकट्या झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांत दिलीप कुमार अंथरूणावर होते. सायरा यांनी त्यांची अगदी लहान मुलासारखी काळजी घेतली. त्यांना तळहातावरच्या फोडासारखं जपलं. मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है, असे सायरा बानो सतत म्हणायच्या. लोकांनी माझे कौतुक करावे, लोकांनी मला पतीव्रता म्हणावे, म्हणून मी दिलीप साहेबांची काळजी घेत नाही तर त्यांच्यावरच्या प्रेमापोटी मी त्यांची काळजी घेतेय. त्यासाठी मला कोणी बळजबरी केलेली नाही. मला कोणत्याही कौतुकाची अपेक्षा नाही. त्यांचा स्पर्श, त्यांचा सहवास हाच माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा आनंद आहे. मी त्यांच्यावर प्रेम करते आणि ते माझा श्वास आहेत, असे सायरा बानो एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. 1966 साली दिलीप आणि सायराबानू यांनी विवाह केला होता. तेव्हा त्या दिलीप यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान होत्या.