राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. सकाळपासूनच नागरिकांनी मतदान करण्यासाठी मतदारसंघांबाहेर रांगा लावल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या मतदानाचा हक्क बजावत चाहत्यांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री संयमी खेर हिनेदेखील मतदानाचा अधिकार बजावला. मतदान झाल्यानंतर संयमीने पोस्ट शेअर करत तिचा अनुभव सांगितला आहे.
संयमीने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रस्त्यांची दुरवस्था झालेली दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत संयमीने पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून तिने ही परिस्थिती सुधारायची असल्यास मतदान करा, असं आवाहन चाहत्यांना केलं आहे. "मी १०.३० वाजता मतदानासाठी गेले होते. तिथे माझ्यापुढे फक्त तीनच लोक होते. जर तुम्ही रस्ते, ज्या हवेने आपण श्वास घेतो यामुळे वैतागला असाल आणि बदल पाहायचा असेल तर प्लीज व्होट करा", असं संयमीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान, २० नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर २३ नोव्हेंबरला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबरपर्यंत राजकीय पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. राज्यात यंदा कोणाचं सरकार स्थापन होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.