अभिनेता साजिद खानचे निधन झाले आहे. वयाच्या ७० व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. साजिद खान हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होते.
साजिद खानचा मुलगा समीर खानने पीटीआयला सांगितले की, 'वडील साजिद खान हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र शुक्रवारी (२२ डिसेंबर) रोजी त्यांचे निधन झाले. साजिद खान यांना केरळमधील अलप्पुझा येथील कायमकुलम टाउन जुमा मशिदीत दफन करण्यात आले. साजिद खान यांनी दुसरं लग्न केलं होतं त्यानंतर ते केरळमध्ये स्थायिक झाले होते. चित्रपट सृष्टीपासून ते दूर गेले होते आणि समाजहिताच्या कामात गुंतले होते, असं समीर म्हणाला.
मेहबूब खानच्या 'मदर इंडिया' या चित्रपटात बिरजूच्या पात्राची छोटी भूमिका साकारल्यानंतर साजिद खान यांना प्रसिद्धी मिळाली होती. 'माया' आणि 'द सिंगिंग फिलिपिना' यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समधूनही त्याने प्रसिद्धी मिळवली. याशिवाय अमेरिकन टीव्ही शो 'द बिग व्हॅली'च्या एका एपिसोडमध्ये तो पाहुण्यांच्या भूमिकेत दिसला होता. साजिद खान हे फिलिपाइन्समध्येही प्रसिद्ध नाव आहे. हा अभिनेता नोरा अनोरसोबत 'द सिंगिंग फिलिपिना', 'माय फनी गर्ल' आणि 'द प्रिन्स अँड आय' सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. याशिवाय मर्चंट-आयव्हरी प्रॉडक्शनच्या 'हीट अँड डस्ट'मध्ये त्याने एका डाकूची भूमिका साकारली होती.