Join us

"मला घर विकावं लागलं आणि भाड्याच्या घरात...", MeTooच्या आरोपांनंतर साजिद खानला काम मिळेना, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:29 IST

२०१८ साली साजिद खानवर मी टू अंतर्गत महिलांनी शोषणाचे आरोप केले होते. त्यामुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.

साजिद खान बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहे. 'हाऊसफूल', 'हिंमतवाला', 'हे बेबी' यांसारखे सुपरहिट सिनेमे त्याने बॉलिवूडला दिले. बिग बॉसमध्येही तो सहभागी झाला होता. २०१८ साली साजिद खानवर मी टू अंतर्गत महिलांनी शोषणाचे आरोप केले होते. त्यामुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. या आरोपांमुळे साजिदला काम मिळणं बंद झालं. त्यामुळे तो नैराश्यात गेला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने याबाबत भाष्य केलं. 

नैराश्यामुळे साजिद खानने कित्येक वेळा आत्महत्या करण्याचाही विचार केल्याचा खुलासा हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत केला. या मुलाखतीत त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि मागच्या सहा वर्षांच्या काळाबद्दल भाष्य केलं. तो म्हणाला, "मागच्या ६ वर्षात माझ्या मनात कित्येकदा आत्महत्येचे विचार आले. भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन निर्देशक संघ(IFTDA) तर्फे मंजूरी मिळाल्यानंतरही मला काम दिलं जात नाहीये. मी पुन्हा माझ्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे". 

"कमाई नसल्याने मला माझं घर विकावं लागलं. मी भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत आहे. १४ वर्षांचा असल्यापासून मी काम करत आहे. माझ्या वडिलांचं निधन झाल्याने मी आणि बहीण फराह खान कर्जात बुडालो होतो. माझी आई आज जिवंत असती तर मी पुन्हा यातून बाहेर पडताना तिने मला पाहिलं असतं. एका मुलापेक्षा जास्त मला तिची काळजी घ्यायची होती. आयुष्य खूप कठीण आहे. जेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले तेव्हा मी जैसलमेरमध्ये शूटिंग करत होतो. माझी आई तेव्हा आजारी होती. या आरोपांनंतर मला सिनेमा सोडावा लागला. पण, आईला याबाबत कळून द्यायचं नव्हतं", असं साजिदने सांगितलं. 

पुढे तो म्हणाला, "त्यानंतर मी १० दिवस असं दाखवलं की सगळं काही ठीक आहे. मी घरातून बाहेर जायचो आणि घरी परतल्यावर असं दाखवायचो की मी सेटवर गेलो होतो. मी कधीच कोणत्याही महिलेविरोधात बोललो नाही आणि कधी बोलणारही नाही. पण, त्या आंदोलनात नावं आलेले सगळे लोक काही ना काही काम करत आहेत. फक्त मलाच काम मिळालेलं नाही. याचं वाईट वाटतं.  यामुळे मला हे समजलं की मला स्वत:ला बदलण्याची गरज आहे". 

टॅग्स :साजिद खानसेलिब्रिटी