‘सलाम बॉम्बे’ (Salaam Bombay ) हा चित्रपट आठवतोय? 1988 साली प्रदर्शिंत झालेल्या मीरा नायरच्या या सिनेमानं प्रत्येक संवेदनशील मनाला पाझर फोडला. मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांचं रोजचं जगणं, त्यांची दैना या चित्रपटात दाखवण्यात आली होती. 61 व्या ऑस्कर पुरस्कारसाठी पाठवण्यात अलेल्या या चित्रपटात रघुबीर यादव, इरफान, अनिता कंवर आणि नाना पाटेकर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार होते. याशिवाय आणखी एक कलाकार होता. खरा स्टार.
होय, कृष्णा म्हणजे चाय पाव... त्याला विसरणं शक्यचं नाही... या चिमुकल्या बालकलाकाराचा अभिनय सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला होता. ही भूमिका बालकलाकार शफीक सय्यद (Shafiq Syed ) याने साकारली होती. यासाठी शफीक सय्यदला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर शफीक सय्यद 1993 मध्ये अन्य एका चित्रपटात दिसला आणि त्यानंतर जणू तो गायब झाला. सध्या हा शफीक सय्यद चार मुलांचा बाप आहे. 29 वर्षांपासून तो कुठे आहे? काय करतो? हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
‘सलाम बॉम्बे’ हा सिनेमा केला तेव्हा शफीक12 वर्षांचा होता. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. अगदी ऑस्करमध्ये त्याची चर्चा झाली होती. शफीकला मोठं स्टार व्हायचं होतं. पण नियतीने त्याच्या नशिबात वेगळंच काही लिहून ठेवलं होतं.
मुंबई पाहायला घरून पळून आला आणि...‘सलाम बॉम्बे’ हा सिनेमा शफीकला कसा मिळाला होता, याची कथाही इंटरेस्टिंग आहे. त्याने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. 1986 साली तो मित्रांसोबत मुंबईत घरून पळून आला होता. कारण त्याला मुंबई पाहायची होती. पण मुंबईत आल्यावर कुठे राहणार? त्याने व त्याच्या मित्रांनी चर्चगेटच्या फुटपाथवर ठाण मांडलं. पण एकदिवस त्याचं अख्खं आयुष्य बदललं. एक महिला त्याच्या व त्याच्या मित्रांजवळ आली आणि अॅक्टिंग वर्कशॉपमध्ये आलास तर 20 रूपये रोज देईल म्हणून त्याला वर्कशॉपला येण्यासाठी राजी करायला लागली. पण हा काहीतरी डाव आहे, असं समजून शफीकचे तिथून पळून गेलेत. शफीक मात्र तिथेच थांबला. दिवसाला 20 रुपये मिळाले तर तो चित्रपट बघू शकेल आणि त्याची आवडती भेळपुरीही खायला मिळेल याचा आनंद त्याला झाला होता. केवळ हा एक विचार करून तो त्या महिलेसोबत गेला. तो वर्कशॉप ‘सलाम बॉम्बे’साठी होता. या वर्कशॉपनंतर शफीकला चाय पाव या मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आलं. त्याने 52 दिवस काम केलं आणि यासाठी त्याला 15 हजार रूपये मानधन मिळालं. शफीक तर 15 हजार मिळाल्यानं हुरळून गेला होता. चित्रपट रिलीज झाला आणि हिट झाला. शफीक आता चाइल्ड स्टार झाला. मीरा नायने नंतर त्याला ‘पतंग’ चित्रपटासाठीही साईन केलं.
पण मग...पण यानंतर जे काही घडलं, त्याची कल्पनाही तुम्ही करू शकणार नाही. चाईल्ड स्टार झालेला शफीक पुन्हा रस्त्यावर आला. कामासाठी त्याने अनेक प्रोड्यूसर्सचे दरवाजे ठोठावले. आठ महिने तो कामासाठी भटकला आणि अखेर थकून, निराश होऊन आपल्या बेंगळुरू येथील घरी परतला. शफीकने ‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याचं खरं आयुष्य ‘सलाम बॉम्बे’मधील चाय पावसारखंच आहे. उदरनिवार्हासाठी त्यांने मिळेल ते काम केलं. त्याने रिक्षा चालवली आणि त्यातून दिवसाला फक्त 150 रुपये मिळायचे. त्याने लाईटमॅन म्हणूनही काम केलं, ज्यामध्ये त्याला आठ तासांच्या शिफ्टसाठी 200-300 रुपये मिळायचे. शफिक अजूनही रिक्षा चालवतो. तो विवाहित असून त्याला चार मुलं आहेत.
पैशांअभावी शफीकच्या दोन मुलांची शाळा सुटली. शफीकला अजूनही वाचता येत नाही याची खंत आहे. आज त्याचं शिक्षण झालं असतं तर तो अभिनेता झाला असता आणि आपल्या मुलांनाही चांगलं भविष्य देऊ शकला असता, असं तो म्हणतो. शफीक सध्या बेंगळुरूमध्ये रिक्षा चालवण्याव्यतिरिक्त कन्नड फिल्म इंडस्ट्रीच्या टीव्ही प्रॉडक्शन युनिटमध्ये सहाय्यक म्हणून काम करतो.