सध्याच्या घडीला कलाविश्वात असंख्य कलाकारांची रेलचेल पाहायला मिळते. यात काही यशस्वी होतात. तर, काही काळाच्या ओघात हरवून जातात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका बालकलाकारची चर्चा रंगलीये. पहिल्याच सिनेमात सुपरहिट ठरलेला हा बालकलाकार आता निनावी आयुष्य जगतोय. इतकंच नाही तर आता उदरनिर्वाहासाठी त्या रिक्षा चालवावी लागत आहे.
इरफान खान याची मुख्य भूमिका असलेला 'सलाम बॉम्बे' हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. 1988 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तुफान लोकप्रियता मिळवली होती. नाना पाटेकर, रघुबीर यादव यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत या सिनेमामध्ये शफीक सय्यद याने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या सिनेमातून लोकप्रिय झालेला हा बालकलाकार आज रिक्षा चालवत असल्याचं समोर आलं आहे.
सलाम बॉम्बे या सिनेमामध्ये शफीकने चापू म्हणजेच चाय पाव ही भूमिका साकारली होती. या सिनेमात त्याने काम केलं त्यावेळी त्याचं वय १२ वर्ष होतं. या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट कामासाठी शफीकला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मुंबई पाहण्यासाठी आलेल्या शफीकने अभिनयाच्या कार्यशाळेत प्रवेश घेतला आणि त्यानंतर त्याला सलाम बॉम्बे सिनेमात काम करायची संधी मिळाली. परंतु, या सिनेमानंतर त्याच्या अभिनयाची जादू फारशी चालली नाही. या सिनेमानंतर तो फक्त एकाच सिनेमात झळकला. त्यानंतर त्याने सिनेविश्वातून काढता पाय घेतला.
शफीकला मिळेना काम
सलाम बॉम्बेनंतर केवळ एका सिनेमात झळकलेल्या शफीकने अनेक निर्मात्यांचे उंबरठे झिजवले. परंतु, त्याला नकार पचवावा लागला. अखेर त्याने आपल्या घरची वाट धरली. काम न मिळाल्यामुळे शफीक बंगळुरुला परत घरी आला. बंगळुरुला परत आल्यानंतर शफीकने सुरुवातीला लाईटमन म्हणून काम सुरु केलं. त्यानंतर तो आता रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतोय.