मुंबई - भारतीय सिनेसृष्टीवर पाच दशकांपेक्षा जास्त काळ अधिराज्य गाजविणारे विख्यात अभिनेते देव आनंद यांच्या जुहू येथील प्रसिद्ध बंगल्याची खरेदी मुंबईतील एका प्रसिद्ध बांधकाम कंपनीने खरेदी केल्याचे वृत्त आहे. या बंगल्याची विक्री ३५० ते ४०० कोटी रुपयांना झाल्याची चर्चा आहे. या बंगल्याच्या जागी लवकरच २२ मजली आलिशान टॉवर उभारण्यात येणार असल्याचे समजते.
उपलब्ध माहितीनुसार, जुहू येथे समुद्र किनारी देव आनंद यांचा आलिशान बंगला आहे. त्या बंगल्यात ते जवळपास ४० वर्षे राहिले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी कल्पना कार्तिक, मुलगा व मुलगी तिथे राहात होते. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी व मुलगी उटी येथे वास्तव्यास गेले. त्यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला आहे.
त्यामुळे बंगल्याच्या देखरेखीसाठी कुणीही नसल्याने त्याची विक्री करण्याचा निर्णय आनंद कुटुंबीयांनी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. देव आनंद यांचे २०११ मध्ये निधन झाले. त्यानंतर मुंबईतील त्यांच्या मालकीच्या स्टुडिओची विक्री करण्यात आली होती. तर काही काळापूर्वी त्यांच्या पनवेल येथील मालमत्तेचीही विक्री करण्यात आली.
केतन आनंद यांच्याकडून खंडनबंगल्याची विक्री झाल्याचे वृत्त असले तरी देव आनंद यांचे पुतणे केतन आनंद यांनी मात्र या विक्रीच्या वृत्ताचे खंडन केले आहे. या संदर्भात देव आनंद यांच्या पत्नी व मुलीशी आपले बोलणे झाले असून असा कोणताही व्यवहार झाला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.