बॉलिवूडमधील सर्वात हिट जोडी दबंग खान सलमान आणि बार्बी गर्ल कतरिना कैफ पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. ही जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर नाही तर एका फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करताना दिसणार आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ आपला जलवा आता रॅम्पवर कॉश्च्युम डिझाइनर मनीष मल्होत्रासाठी दाखवणार आहेत. मनीष मल्होत्रासाठी शो स्टॉपर्स म्हणून हे दोन्ही स्टार्स दिसणार आहेत. मनीष मल्होत्राने स्वतः ही माहिती इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून दिली आहे.
सर्वात पहिले कतरिनाचा व्हिडिओ मनीष मल्होत्राने शेअर करत १ ऑगस्टला सुंदर आणि स्टनिंग अभिनेत्री कतरिना कैफ इंडो पर्शियन कलेक्शनसहित रॅम्पवर उतरणार आहे, अशी कॅप्शन दिली होती. त्यानंतर काही वेळातच सलमान खानच्या फोटोंचा व्हिडिओ शेअर करत ‘१ ऑगस्टला मनीष मल्होत्रा लेबलला १३ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने होणाऱ्या शो मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी सुपरस्टार सलमान खान कतरिनासह इंडो – पर्शियन वेशात सगळ्यांना दिसेल,’ असे सांगितले.
कतरिना आणि सलमान ही जोडी नेहमीच प्रेक्षकांना आवडली आहे आणि मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमध्ये सलमान व कतरिनाला रॅम्प वॉक करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.
सध्या सलमान खान दिग्दर्शक अली अब्बास जाफरच्या ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून दुसऱ्या बाजूला ‘दबंग ३’ च्या चित्रीकरणालाही त्याने सुरूवात केली आहे. तर कतरिना शाहरूख खानबरोबर ‘झिरो’ या चित्रपटात दिसणार असून तिच्याबरोबर अनुष्का शर्माचीही महत्त्वाची भूमिका या चित्रपटात आहे. शिवाय ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’मध्येही कतरिना आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासह दिसणार आहे. सलमान व कतरिना यांना रॅम्पवॉकवर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.