बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि आलिया भट ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाच्या तयारीला लागले होते. संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. पण आता ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाबद्दल एक धक्कादायक बातमी आहे. होय, सलमान-आलियाचा हा चित्रपट अनिश्चितकाळासाठी थंडबस्त्यात पडला आहे. होय, संजय लीला भन्साळींच्या प्रॉडक्शन हाऊसने ट्वीट करून याबद्दलची घोषणा केली. ‘भन्साळी प्रॉडक्शनने ‘इंशाअल्लाह’ हा चित्रपट न बनवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल,’असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे. या ट्वीटचा अर्थ स्पष्ट आहे, तो म्हणजे ‘इंशाअल्लाह’ थंडबस्त्यात गेला आहे.
हे आहे कारणभन्साळींनी ‘इंशाअल्लाह’ बंद करण्याचा निर्णय घेतला, यामागे कारण आहे पटकथेतील हस्तक्षेप. होय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी आलिया व भन्साळींची भेट झाली होती. तेव्हापासून या चित्रपटाबद्दलचा वाद सुरु झाला होता. आधी भन्साळींचा हा चित्रपट ‘प्रीटी वूमेन’ या हॉलिवूड चित्रपटावर बेतलेला असल्याची बातमी लीक करण्यात आली. काहींच्या मते, ही बातमी जाणीवपूर्वक लीक केली गेली, जेणेकरून भन्साळींना आपल्या कथेत बदल करणे भाग पडेल. भन्साळींच्या जवळच्या लोकांच्या मते, ‘इंशाअल्लाह’चा ‘प्रीटी वूमन’ या हॉलिवूड चित्रपटाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. गत रविवारी ‘इंशाअल्लाह’च्या वितरणाचे हक्क 190 कोटीला विकण्यात आल्याची बातमी पसरवली गेली. यानंतर काहीच तासांत सलमानने ‘इंशाअल्लाह’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. या सगळ्या घडामोडींमुळे भन्साळी संतापले आणि त्यांनी ‘इंशाअल्लाह’ बंद करण्याचा निर्णय घेतला. भन्साळींनी आलियाला शनिवारीच हा चित्रपट बंद झाल्याची माहिती दिली होती. भन्साळी प्रॉडक्शनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या कथेत सतत हस्तक्षेप केला जात होता. भन्साळी आपल्या चित्रपटांबद्दल मोठ मोठ्या दिग्गजांचे ऐकत नाहीत. पण सलमानला कथेत बदल हवा होता. त्याने ‘दबंगगिरी’ दाखवणे सुरु केले आणि प्रकरण चिघळले.