सलमान खानची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. बॉलिवूडचादबंग खान म्हणून ओळखल्या जाणा-या सलमानने आजपर्यंत कित्येक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण सलमानला सुपरस्टार बनवण्यात एका व्यक्तिचा मोठा हात आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का?होय, सलमानने ‘बीवी होतो ऐसी’ या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण या चित्रपटातील त्याची भूमिका ही साहाय्यक अभिनेत्याची होती आणि त्यातही या चित्रपटाची कथा ही रेखा, कादर खान, बिंदू आणि फारुक शेख या मुख्य कलाकारांभोवतीच फिरत होती. त्यामुळे या चित्रपटात सलमान आहे हेच कुणाच्या गावी नव्हते. प्रेक्षकांच्या लक्षात देखील राहिला नव्हता. त्यामुळे सलमान एका चांगल्या भूमिकेच्या शोधात होता. अखेर त्याला तो चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे नाव होते, ‘मैंने प्यार किया’. या चित्रपटामुळे सलमान एका रात्रीत स्टार झाला. पण या चित्रपटासाठी सलमान नाही तर त्याआधी एका दुस-याच अभिनेत्याची निवड झाली होती. हा अभिनेता कोण होता, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
या अभिनेत्याचे नाव होते, फराज खान. होय, सुप्रसिद्ध अभिनेते युसूफ खान यांचा मुलगा फराज खान याला सर्वप्रथम ‘मैंने प्यार किया’साठी साईन केले होते.सुरज बडजात्या यांनी ‘मैंने प्यार किया’साठी अनेक नवीन चेह-यांचे ऑडिशन घेतले होते आणि यातून फराज खानची निवड करण्यात आली होती. चित्रपटासाठी फराजला साइन करण्यात आले आणि चित्रपटाच्या चित्रीकरणाची तारीखदेखील ठरली. पण ऐनवेळी फराज खूप आजारी पडला. चित्रीकरण करणे त्याला शक्यच नव्हते. त्यामुळे सुरज बडजात्या प्रचंड टेन्शनमध्ये आले.
फराज ‘प्रेम’च्या भूमिकेसाठी योग्य आहे या मतावरच सुरज ठाम होते. पण फराजची तब्येत सुधारण्याची कुठलेही चिन्हे दिसत नव्हती. अखेर सूरज बडजात्यांना दुसरा पर्याय शोधणे भाग पडले. याचदरम्यान कुणीतरी त्यांना सलीम खान यांच्या मुलाचे म्हणजेच सलमान खानचे नाव सुचवले. त्यावेळात सलमानदेखील चित्रपटांच्या शोधात होता. सुरज यांना सलमान ‘प्रेम’च्या भूमिकेसाठी योग्य वाटला आणि त्याची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. फराज खान आजारी पडला नसता तर ही भूमिका फराज खानने साकारली असती. पण कदाचित सुपरस्टार होणे सलमानच्या नशिबात होते.
‘ मैंने प्यार किया’ हा चित्रपट गमावल्यानंतर अनेक वर्षांनी फराजने ‘फरेब’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर तो पृथ्वी, मेहंदी, दुल्हन बनू मैं तेरी यांसारख्या चित्रपटात झळकला. पण त्याचा एकही चित्रपट बॉक्स आॅफिसवर चालला नाही. आज तो अज्ञातवासात जगतोय.