कोरोना व्हायरसने जगभरात आपलं थैमान घातले आहे. आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमाची शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर दिल्ली, केरळ आणि जम्मूमध्ये मल्टीप्लेक्स आणि थिएटरदेखील बंद करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसचा वाढत धोका पाहता बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित सिनेमांच्या तारखांसह काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि अजय देवगण स्टारर आगामी सिनेमा सूर्यवंशी देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडला असून या चित्रपटाच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानानंतर आता बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानने देखील एक निर्णय घेतला आहे. सलमान खान एका कॉन्सर्टसाठी एप्रिल महिन्यात अमेरिकेला जाणार होता. हे कॉन्सर्ट 10 दिवसांचे होते. पण सलमानने आता हे कॉन्सर्ट रद्द केले आहे. सलमानचे हे कॉन्सर्ट 3 ते 12 एप्रिलच्या दरम्यान होणार होते. हे कॉन्सर्ट त्याचा भाऊ सोहेल खानच्या कंपनीनेच आयोजित केले होते. सलमान या कॉन्सर्टच्या निमित्ताने अटलांटा, न्यू जर्सी, बॉस्टन, टोरंटो, डलास, हॉस्टन, सैन जोस और सिएटल अशा विविध शहरात जाणार होता.
सलमानच्या मॅनेजरने मीडियाला याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, सध्या परदेशात प्रवास करणे योग्य नाहीये. कोरोना व्हायरसचा धोका कमी झाल्यानंतर आम्ही पुन्हा या कॉन्सर्टच्या नवीन तारखेची घोषणा करणार आहोत...
सलमानप्रमाणे हृतिकने देखील त्याचा अमेरिकेतील एक कॉन्सर्ट रद्द केला आहे. त्याचा कॉन्सर्ट 10 एप्रिलपासून सुरू होणार होता.
कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.