कलाकार : सलमान खान, पूजा हेगड़े, वेंकटेश, जगपती बाबू, भाग्यश्री, भूमिका चावला, राघव जुयाल, शहनाज गिल, तेज सप्रू, आसिफ शेख, सतीश कौशिक, रोहिणी हट्टंगडीदिग्दर्शक : फरहाद सामजीनिर्माती : सलमा खानशैली : रोमँटिक अॅक्शन ड्रामाकालावधी : दोन तास२४ मिनिटेस्टार : दोनचित्रपट परीक्षण : संजय घावरे
२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वीरम' या तमिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. ईदचा मुहूर्त आणि सलमान खानचा सिनेमा हे गणित मागील बऱ्याच वर्षांपासून यशस्वी ठरत आहे. हाच मुहूर्त पुन्हा कॅश करण्यासाठी 'किसी का भाई किसी की जान' रिलीज झालाय. कदाचित सलमानचे चाहते हा डोक्यावर घेतलीही, पण एक परिपूर्ण चित्रपट बनवण्याऐवजी कन्फ्युज करणारा चित्रपट दिग्दर्शक फरहाद सामजीने बनवला आहे. यात सलमानचा जलवा आणि साऊथचा तडका इतकंच आहे.
कथानक : कधी पेंटिंग, तर कधी मूर्ती बनवताना दिसणारा, कोणतंही नाव नसलेला भाईजान आपल्या लव्ह, इश्क, मोह या तीन भावांसह एका वस्तीत राहतोय. या वस्तीवर तिथल्या एमएलएचा डोळा आहे. तीन भाऊ सुकून, मुस्कान आणि चाहत या तीन तरुणींच्या प्रेमात पडतात. आपल्या लग्नापूर्वी भाईजानचं लग्न जुळवण्यासाठी त्याचं पहिलं प्रेम असलेल्या भाग्याला भेटायला मुंबईला येतात, पण तिचं लग्न होऊन मुलाचं लग्न होणार असतं. अशातच भाग्या नावाची तरुणी त्यांच्या वस्तीत येते. तीन भाऊ तिची आपल्या समोरच्या घरी रहायची व्यवस्था करतात. त्यानंतर कथानकाला कलाटणी मिळते.
लेखन-दिग्दर्शन : कथा म्हणावी असं काहीच नाही. सही से होगा सही गलत से गलत... अच्छी तरह समझाया अब बुरी तरह मारुंगा... इन्सानियत में है दम वंदे मातरम... हे सलमानच्या नेहमीच्या शैलीतील डायलॅाग्ज टाळ्या-शिट्या मिळवणारे आहेत. सुरुवातीपासून मध्यंतरापर्यंत गती खूप मंद असून, भाईजानला मुलगी पाहण्याखेरीज काही घडत नाही. मध्यांतरापूर्वी एक नाट्यमय वळण आल्याने पुढे सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता वाढते. मध्यंतरानंतर अॅक्शनचा धमाका आहे. सलमानची एक स्टाईल आहे, जी अभिनयापासून डान्सपर्यंत सर्वत्र दिसते. पंजाबी गाणं समजत नाही. सलमानच्या आवाजातील गाणं चांगलं झालं आहे. 'बठुकम्मा...' गाणं अर्धच दाखवलं आहे. साऊथच्या संवादांवेळी इंग्रजी कॅप्शन हवी होती. सर्वात मोठा प्रॅाब्लेम एडिटींगचा आहे. नायिकेच्या एंट्रीच्या सीनपासून गाण्यातील दृश्यांमध्ये हे कायम जाणवतं. कँटीन्यूटीकडेही दुर्लक्ष झालं आहे. भाग्यश्री आणि भूमिका चावला या सलमानच्या पूर्वीच्या चित्रपटांतील दोन नायिका यात आहेत.
अभिनय : या चित्रपटातही सलमाननं आपला जलवा दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला तरी त्याचं वय पडद्यावर स्पष्ट दिसतं. हालचालीही काहीशा मंदावल्यासारख्या वाटतात. पूजा हेगडेने पूर्वीच्या चित्रपटांपेक्षा चांगलं काम केलं आहे. चित्रपटात कुठेही दोघांची केमिस्ट्री जाणवत नाही. वेंकटेशनं साकारलेला अन्नया छान झाला आहे. राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम यांनी भावांच्या भूमिकेत चांगलं काम केलं असून, त्यांना शहनाज गिल, पलक तिवारी, विनाली भटनागर यांनी चांगली साथ दिली आहे. जगपथी बाबूने साकारलेला खलनायक खतरनाक वाटतो. सतिश कौशिक, अभिमन्यू सिंग, रोहिणी हट्टंगडी, भूमिका चावला आदी कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : अभिनय, अॅक्शन, संवाद, कॅास्च्युम, लोकेशन्स, सिनेमॅटोग्राफी, कोरिओग्राफीनकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, संकलन, रंगभूषा, व्हिएफएक्स, मंद गती, चित्रपटाची लांबीथोडक्यात काय तर हा चित्रपट म्हणजे वास्तवातही अविवाहित असलेल्या भाईजानच्या लग्नाचा घाट घालण्याचा प्रयत्न आहे. सलमानचे चाहते हा पाहतीलच, पण मोकळा वेळ असेल तर एकदा चान्स घ्यायला हरकत नाही.