Bajrangi Bhaijaan 2 : 2015 मध्ये आलेला ‘बजरंगी भाईजान’ (Bajrangi Bhaijaan ) हा ब्लॉकबस्टर चित्रपट आठवत असेलच. कबीर खानने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाला 7 वर्ष पूर्ण झाली आहे. ‘बाहुबली’चे पटकथालेकच के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी ‘बजरंगी भाईजान’ची कथा लिहिली होती. तुम्हीही या चित्रपटाचे फॅन असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ‘बजरंगी भाईजान’चा सीक्वल लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे.
‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट सलमान खानच्या (Salman Khan ) कारकिदीर्तील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. आता ‘बजरंगी भाईजान’च्यासीक्वलबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. ‘बजरंगी भाईजान’चे पटकथा लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी ‘पिंकविला’ ला दिलेल्या मुलाखतीत ‘बजरंगी भाईजान 2’बद्दल मोठा खुलासा केला. ‘बजरंगी भाईजान 2’ची स्टोरी लॉक झाली आहे. सलमानला सुद्धा आम्ही स्टोरी ऐकवली असून त्याला ती प्रचंड आवडली आहे. आता सलमान चित्रपटाच्या शूटबद्दल काय निर्णय घेतो, काय टाइमलाइन ठरवतो, ते बघूच, असं ते म्हणाले.
‘बजरंगी भाईजान 2’ची कथा कशी असेल?
‘बजरंगी भाईजान’चे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी सांगितले की,‘बजरंगी भाईजान 2’ ची कथा पहिल्या भागाच्या तुलनेत खूपच वेगळी असणार आहे. ‘बजरंगी भाईजान 2’च्या कथेत 8 ते 10 वर्षांचा लीप असेल आणि कथा पहिल्या पार्ट इतकीच मनोरंजक असेल. सध्या आम्ही चित्रपटाच्या कथेवर लक्ष केंद्रित केलं आहे.’
टायटल बदलणार...‘बजरंगी भाईजान’ सुपरडुपर हिट झाल्यानंतर 2021 साली सलमान खानने या चित्रपटाचा सीक्वल येणार, अशी हिंट दिली होती. सीक्वलमध्ये सलमान खान दिसणार, हेही फायनल आहे. कथा आधीच ठरली आहे. पण यावेळी टायटल बदलणार आहे. सीक्वलचं नाव ‘पवनपुत्र भाईजान’ असेल असं कळतंय.
हर्षाली दिसणार का?‘बजरंगी भाईजान’मध्ये हर्षाली मल्होत्राने मुन्नीची भूमिका साकारली होती. तिची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. गेल्या 7 वर्षांत मुन्नी चांगलीच मोठी झाली आहे. ‘बजरंगी भाईजान’च्या सीक्वलमध्ये ती दिसणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तूर्तास तरी याबद्दलचा खुलासा झालेला नाही. करिनाा कपूर या चित्रपटात दिसणार का? हेही गुलदस्त्यात आहे. एकंदर काय तर सलमान सोडून अन्य कास्टिंगबद्दल सन्पेन्स आहे.