सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट ‘लवरात्रि’चे ‘लवयात्री’ असे नवे नामकरण करण्यात आले आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या मार्गात कुठलेही विघ्न नको, म्हणून मेकर्सनी हा निर्णय घेतल्याचे कळतेय.या चित्रपटाद्वारे सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. याशिवाय वरिना हुसैन ही अभिनेत्रीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय.आयुष शर्मा व वरिना हुसैन स्टारर या चित्रपटाची थीम आणि कथा सगळे काही बघता याचे ‘लवरात्रि’ असे नामकरण करण्यात आले होते. पण या नावावर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. या वादानंतर उत्तर प्रदेशातील ‘हिंदू ही आगे’ या हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख गोविंद पराशर यांनी सलमानला भर रस्त्यात मारणा-यास ५ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. ‘लवरात्रि’च्या पोस्टर्सची होळी करण्यात आली होती. केवळ इतकेच नाही तर एका वकीलाने बिहारमध्ये या चित्रपटाच्या शीर्षकाविरोधात तक्रार दाखल केली होती. हे शीर्षक हिंदूंच्या भावना दुखावणारे असल्याचा आरोप त्याने केला होता. हे सगळे वाद बघता, सलमानने चित्रपटाचे नाव बदलणेचं योग्य समजले. मंगळवारी रात्री सलमानने नव्या नावासह चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केले.
गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला ‘लवयात्री’ एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. ट्रेलरमधून कथेचा थोडाफार अंदाज येतो. कदाचित वरीना गुजरातेत येते आणि येथे तिची भेट आयुषसोबत होते. मग दोघांची मैत्री आणि पुढे प्रेम. पण यासाठी दोघांनीही बऱ्याच अग्नी दिव्यातून जावे लागते, अशी याची ढोबळ कथा असल्याचे भासते.