अख्ख्या देशात कोरोनाने हैदोस घातला आहे. देशातही कोरोनाचा प्रकोप वाढत असताना सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे. अशात बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या पुतण्याचे नुकतेच निधन झाले. सलमानचा 38 वर्षीय पुतण्या अब्दुल्ला खान उर्फ आबा याच्या निधनाविषयी खुद्द सलमाननेच सोशल मीडयाद्वारे माहिती दिली होती.
अब्दुल्ला हा सलमानच्या चुलतभावाचा मुलगा होता. अब्दुल्लाच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. त्याला हृदयरोग आणि मधुमेहाचाही त्रास होता. दोन दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली.
सध्या भारतात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलमानला अब्दुल्लाचे शेवटचे दर्शनदेखील घेता आहे नाही या गोष्टीचे सलमानला प्रचंड वाईट वाटत आहे. सलमान सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत पनवेल येथील फार्म हाऊसमध्ये आहे. पनवेलमध्ये असतानाच सलमानला ही दुःखद बातमी समजली. बॉम्बे टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब पनवेलला असल्याने अब्दुल्लाचे अंतिम दर्शन त्यांना घेता आलेले नाहीये. अब्दुल्लावर अंतिम संस्कार इंदौर मध्ये होत असल्याने खान कुटुंबियांना सध्याच्या स्थितीत तिथे जाणे शक्य नाहीये. लॉकडाऊन संपल्यानंतर सलमान आणि त्याचे कुटुंबीय अब्दुल्लाच्या कुटुंबियांना जाऊन भेटणार आहेत. शेवटच्या क्षणी अब्दुल्लासोबत राहाता न आल्याने सलमान चांगलाच भावुक झाला आहे.
अब्दुल्ला एक बॉडी बिल्डर होता. सलमान आणि अब्दुल्ला या दोघांनी बॉडी बिल्डिंगचे ट्रेनिंग एकत्र घेतले होते. काही काळापूर्वी अब्दुल्लाने जिम उपकरणांचा ब्रँड सुरू केला. सलमानच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो महेश्वरलाही गेला होता. सलमान खान आणि तो दुचाकीवर फिरतानाचा फोटो तेव्हा समोर आला होता. गेल्या वर्षी अब्दुल्लाचा अपघात झाला होता. त्यामुळे त्याला अनेक औषधं खावी लागत होती. पण 23 मार्चला त्याने औषध घेतले नाही. म्हणून काम करताना त्याला छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या, त्यानंतर त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे निधन झाले.