सलमान खानचा ‘दबंग 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि काही गाणीही रिलीज झाली आहेत. साहजिकच भाईजानच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पण आता भाईजानचा ‘दबंग 3’ हा सिनेमा वादात सापडला आहे. होय, वाद इतका विकोपाला गेला की, आता ‘दबंग 3’च्या प्रदर्शनावर बंदी टाकण्याची मागणी केली जात आहे. आता हा वाद का? ते जाणून घेऊ या.मुळात या चित्रपटातील एका गाण्यावरून वादाला तोंड फुटले आहे. या गाण्याद्वारे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे.
रिपब्लिक वर्ल्ड या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचे ‘हुड हुड दबंग दबंग’ हे टायटल सॉन्ग हिंदूच्या भावना दुखावणारे असल्याचा हिंदू जनजागृती समितीचा आरोप आहे. या समितीचे महाराष्ट्र व झारखंडचे आयोजक सुनिल घनवट यांनी या गाण्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या गाण्यात काही ऋषी सलमानसोबत आक्षेपार्हपद्धतीने डान्स करताना दिसतात. हे सगळे हिंदूंच्या भावना दुखावणारे असल्याचे सुनिल घनवट यांनी म्हटले आहे. ऋषीमुनींच्या जागी मौलवी आणि फादर-बिशप यांना नाचताना दाखवण्याची हिंमत मेकर्स करतील का? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
‘दबंग 3’ हा ‘दबंग’ फ्रेंचाइजीचा तिसरा पार्ट आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, किच्चा सुदीप मुख्य भूमिकेत आहेत. ‘दबंग’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. या चित्रपटात सलमानने साकारलेली चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड भावली. या चित्रपटाची सगळीच गाणी चांगलीच गाजली होती. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील संवाद देखील लोकांच्या तोंडपाठ झाले होते. या चित्रपटातील सोनाक्षी सिन्हा आणि सलमानच्या केमिस्ट्रीची देखील चर्चा झाली होती.