बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी(१४ एप्रिल) गोळीबार झाल्याची घटना घडली. पहाटे ५ वाजताच्या सुमारास सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञांताकडून हवेत गोळीबार करण्यात आला. याबाबत पोलिसांनी FIR दाखल केला असून याचा तपास सुरू आहे. सलमानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणानंतर आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती.
घराबाहेर गोळीबारानंतर सलमानने कुटुंबीयांबाबत चिंता व्यक्त केली होती. आता सलमानचे वडील सलीम खान यांनी या प्रकरणावर मौन सोडलं आहे. न्यूज १८शी बोलताना सलीम खान काळजी करण्यासारखं काहीच कारण नसल्याचं सांगतिलं. ते म्हणाले, "त्यांना फक्त पब्लिसिटी हवी होती. काळजी करण्याचं काहीच कारण नाही." दरम्यान, या प्रकरणानंतरही सलीम खान घाबरले नसल्याचे सलमानच्या मित्राने सांगितलं होतं. घराबाहेर गोळीबार झाल्यानंतरही सलीम खान त्यांचं रुटीन फॉलो करत मॉर्निंग वॉकला गेले होते.
सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोई या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे घेण्यात आली आहे. बिश्नोई गँगकडून सलमानला याआधीही अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाचं खरंच बिश्नोई गँगशी कनेक्शन आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
नेमकं काय घडलं गॅलक्सीबाहेर?
सलमान खान वांद्रे येथील गॅलक्सी या इमारतीमध्ये राहतो. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सलमान रहात असून तो चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर येतो. याच पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीत दोन व्यक्तींनी गोळीबार केला. यात एक गोळी ग्रीलच्या खालच्या बाजूला लागली. तर, दुसरी गोळी गॅलरीच्या आतल्या भिंतीला आणि तिसरी गोळी गॅलरीच्या बाहेरच्या भिंतीला लागली. तसंच अजून दोन गोळ्याही झाडल्या. सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींपैकी एका व्यक्तीची ओळख पटली आहे. त्यानुसार, गँगस्टर विशाल ऊर्फ कालू हा या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी असल्याचं म्हटलं जात आहे.