बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी(१४ एप्रिल) गोळीबार झाल्याची घटना घडली. पहाटे ५ वाजताच्या सुमारास सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञांताकडून हवेत गोळीबार करण्यात आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी सलमानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे. या प्रकरणानंतर खान कुटुंबीयांबाबत आता सलमानच्या मित्राने माहिती दिली आहे.
गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही. त्यामुळे खान कुटुंबीय पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती बिजनेसमॅन आणि सलमानचे मित्र जफर सरेशवाला यांनी दिली आहे. गोळीबार झाल्यानंतर जफर सरेशवाला सलमानला भेटायला गेले होते. या प्रकरणामुळे सलमानचे वडील सलीम खान घाबरले नसून त्यांनी त्याच्या रुटीनप्रमाणे मॉर्निंग वॉक केल्याचंही सांगितलं. एएनआयशी बोलताना ते म्हणाले, "सलीम खान सकाळी वॉकला गेले होते. ते जराही घाबरलेले नाहीत. हे सगळं दहशत निर्माण करण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी केलं गेलं. पण, त्याचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झालेला नाही."
दरम्यान, सलमानच्या वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी FIR दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. सलमानच्या घराबाहेरील सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येत आहे.
सलमानच्या घराबाहेर नेमकं काय घडलं?
'एएनआय'शी बोलताना पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर नेमकं काय घडलं? याची माहिती दिली आहे. "दोन व्यक्ती सकाळी ५च्या सुमारास बाईकवरुन आल्या आणि त्यांनी घराबाहेर हवेत गोळीबार केला. त्यानुसार आम्ही FIR दाखल केला असून पोलीस तपास सुरू आहे. ४-५ वेळा हवेत गोळीबार केला. फॉरेंसिक टीमही घटनास्थळी आहे. आमच्या १५पेक्षा अधिक टीम यावर तपास करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही," अशी माहिती मुंबईचे डीसीपी राज तिलक रौशन यांनी दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे.