Join us

भाईजाननं मृत्यूच्या दाढेतून वाचवलं होतं या अभिनेत्रीला, देवाप्रमाणे पूजायचंय तिला सलमानला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 3:28 PM

या अभिनेत्रीनं सलमानसोबत एका चित्रपटात काम केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत 'वीरगति' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री पूजा डडवाल मृत्यूच्या दाढेतून परतली आहे. आजारपणात तिच्या मदतीसाठी सलमान खान पुढे सरसावला होता. आता पूजा बॉलिवूडमध्ये कामाच्या शोधात आहे. ती सांगते की, आता कुणाच्या मदतीची गरज नसून आता काम करून पुढचं जीवन जगायचं आहे.

२०१८मध्ये पूजा टीबी आणि फुफ्फसांच्या आजाराशी सामना करत होती. तिच्याकडे उपचारांसाठी पैसैही नव्हते. शिवडीच्या टीबी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं होतं. पूजाकडे उपचारासाठी पैसे नसल्यामुळे तिनं सलमान खानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. तिनं सांगितलं की, 'मला ६ महिन्यांपूर्वी कळलं की मला टीबी झाला आहे. मी मदतीसाठी सलमान खानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण अद्याप बोलणं झालं नाही. जर तो माझा व्हिडिओ पाहिल, तर माझी मदत करेल. गेल्या १५ दिवसांपासून मी रुग्णालयात दाखल आहे. मी गेली काही वर्षे गोव्यात कॅसिनो मॅनेज करत होती. माझ्याकडे काहीच पैसे नाहीत. चहा प्यायलादेखील मला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत आहे.' त्यानंतर मात्र सलमान खानच्या टीमनं तिच्या उपचाराचा सगळा खर्च उचलला. पूजा आता बरी झाली असून कामाच्या शोधात आहे.

आता पूर्ण बरी झाल्यानंतर पूजा कामाच्या शोधात आहे. ती म्हणाली की, मला पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करायचे आहे. मी २ दशकांपूर्वी बॉलिवूड सोडले, परंतु मला आता पुन्हा अभिनय करायचा आहे. चित्रपटच नाही तर टीव्ही किंवा एखाद्या डिजिटल माध्यमात कोणता प्रोजेक्ट मला मिळालं तरी मी आनंदाने स्वीकारेन.

आपल्या आजारपणाच्या वेळची आठवण काढताना पूजा म्हणाली की, तिच्या कुटुंबाने कोणतीच मदत केली नाही. तिला रक्ताच्या उलट्या होत होत्या, केस गळत होते. तिने तिचा मित्र व दिग्दर्शक राजेंद्र सिंगला परिस्थिती सांगितल्यानंतर मुंबईचं तिकिट काढून दिलं आणि त्याने ती मुंबईत परतली तेव्हा तिची अवस्था पाहून हैराण झाले होते. त्यावेळी तिचं वजन फक्त २६ किलो होतं. राजेंद्र यांनी तिला शिवडीतील टीबी रुग्णालयात दाखल केलं. पैसे नसल्यामुळे उपचारासाठी अडचणी येत होत्या. मात्र माझ्या आजारपणाबद्दल सलमानला समजल्यावर तो माझ्या मदतीसाठी पुढे सरसावला.

पूजाने सांगितलं की, सलमानची टीम मला एका खासगी रुग्णालयात पाठवणार होती मात्र, मीच त्यासाठी नकार दिला. टी.बीचा उत्तम इलाज हा सरकारी रुग्णालयात होतो असं मी ऐकलं होतं. सलमान खानच्या टीमने पूर्ण ६ महिने रुग्णालयात माझी काळजी घेतली. २४ तास माझ्या मदतीसाठी एक माणूस तिथे असायचा. सरकारी रुग्णालयात माझ्यासाठी स्वतंत्र बेड आणला गेला, जनरल वॉर्डमध्ये माझ्या बेडशेजारी पडदा लावण्यात आला. माझ्या खाण्या-पिण्याकडेही सलमानच्या टीमचे लक्ष होते. 

ती पुढे म्हणाली की, मी दोन दिवसात रुग्णालयात नऊ लोकांना मरताना पाहिलं होतं. मला वाटत होतं की आता माझा नंबर आहे. पण, सलमानने मला जीवनदान दिले. आता माझं पुढील आयुष्य त्याच्यासाठी आहे. आता मला पुढील जीवन चांगलं जगायचंय आणि अभिनयात पुन्हा कमबॅक करायचं आहे. मेहनत करून मला घर विकत घ्यायचं आहे. या घरात मला देवाचा फोटो नाही तर सलमानचा फोटो लावून पूजायचा आहे. सलमानला भेटून मला त्याचे आभार मानायचे आहेत.

टॅग्स :सलमान खान