सलमान खानने भारत या चित्रपटाच्या लूकसाठी घेतली आहे ही मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 09:00 PM2019-04-23T21:00:00+5:302019-04-23T21:00:02+5:30
भारत या चित्रपटात सलमान वेगवेगळ्या पाच लुकमध्ये दिसत असून या सगळ्याच लूकची चर्चा सध्या रंगली आहे.
बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'भारत'चा ट्रेलर २४ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र हॉलिवूडच्या पावलांवर पाऊल ठेवत 'भारत'च्या निर्मात्यांनी काही निवडक प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आणि त्यांची मते जाणून घेतली. यापूर्वी शाहरूख खानने त्याच्या घरी मन्नतवर काही प्रसारमाध्यमांना चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटाचा ट्रेलर दाखवून त्यांची प्रतिक्रिया घेतली होती. परंतु असे करण्याची सलमान खानची पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
'भारत'च्या ट्रेलरची सुरुवात फ्लॅशबॅकने होते. भारत (सलमान खान) सर्कसमध्ये काम करत असतो. जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर देशात बेरोजगारीची समस्या निर्माण होते. त्याच दरम्यान सलमान तेल खाणीत कामाला लागतो आणि तिथे त्याची ओळख कतरिनाशी होते. सर्वकाही सुरळीत सुरू असताना खाणीत अपघात होतो आणि अपघातातून देखील भारत सुखरुप वाचतो. ट्रेलरमध्ये सलमानचे कतरिनाशी लग्न झालेले पाहायला मिळत आहे. थोडक्यात काय तर भारत सिनेमात अॅक्शन, रोमान्स आणि देशभक्ती पाहायला मिळणार आहे आणि चार टप्प्यात या चित्रपटाची कथा उलगडण्यात येणार आहे.
या चित्रपटात सलमान वेगवेगळ्या पाच लुकमध्ये दिसत असून या सगळ्याच लूकची चर्चा सध्या रंगली आहे. या चित्रपटातील सगळे लूक परफेक्ट असावेत यासाठी स्वतः सलमानने बारकाईने लक्ष दिले आहे. त्याने अनेक लुक्स ट्राय केल्यानंतर या चित्रपटांमधील सगळ्या लूकची निवड केली आहे. या चित्रपटातील एका लुकमध्ये सलमान दाढी आणि मिशीमध्ये दिसणार आहे. या लूकमध्ये मिशी खालच्या दिशेने असावी की वरच्या दिशेने यावर त्याने चित्रपटाच्या टीमसोबत प्रचंड चर्चा केली होती असे या चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जाफर यांनी सांगितले. अनेक जणांसोबत चर्चा केल्यानंतर त्याने या चित्रपटातील सगळे लुक्स ठरवले आहेत.
'भारत' चित्रपटात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. भारताच्या पूर्वजांनी कुठल्या प्रकारच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते आणि आजचा भारत कसा आहे, अशी या चित्रपटाची ढोबळ कथा आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरीना कैफसोबत जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत. ईदच्या मुहूर्तावर 'भारत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.