कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, बिझनेसमन, राजकारणी पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत.
दबंग स्टार सलमान खाने आपली जबाबदारी ओळखून यापूर्वी बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक हजार कामगारांना मदत केली होती. या कामगारांना काम नसतानाही वेतन देण्याचं काम सलमानने केले. तसेच सलमानची बिईंग ह्युमन ही संस्था कोरोनाच्या या संकटात लोकांना विविध मार्गाने मदत करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या संस्थेच्या माध्यमातून सलमानने १ लाख सॅनिटायझरच्या बाटल्या मुंबई पोलिसांनी दिल्या होत्या. आता सलमान मराठी रंगभूमीच्या मदतीसाठी धावून आला आहे. सलमानने आता अनेक रंगभूमीवर काम करणारे बॅकस्टेज आर्टिस्ट आणि नाट्यगृहांमधील कर्मचाऱ्यांसाठी एक खूप चांगले काम केले आहे.
समाजसेवक राहुल कनाल यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, सलमान भाई तुम्ही केलेल्या मदतीसाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. रंगभूमीवरील बॅकस्टेज आर्टिस्ट आणि नाट्यगृहात काम करणारे कर्मचारी यांची सध्याची असलेली परिस्थिती सांगितल्यानंतर तुम्ही लगेचच त्यांना मदत करण्यास होकार दिला. सलमान यांनी १८६ कर्मचाऱ्यांची आतापर्यंत मदत केली असून त्यांनी तांदूळ, गव्हाचे पीठ, तेल, मीठ, मसाले, चहाची पावडर अशा दैनंदिन जीवनात लागलेल्या वस्तू त्यांच्यापर्यंत आमच्या माध्यमातून पोहोचवल्या आहेत.