Salman Khan House Firing Case : अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सलमान खानच्या निवासस्थान गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनने तुरुंगातच आत्महत्या केली होती. त्यानंतर अनुजच्या आईने सीबीआय तपासासाठी याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये सलमान खानचेही नाव आरोपी म्हणून होते. आता मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या याचिकेतून सलमान खानचे नाव वगळण्याचे आदेश दिले आहेत.
सोमवारी न्यायमूर्ती रेवती यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने याचिकेतून सलमान खानचे नाव वगळण्याचे आदेश दिले आहेत. खंडपीठाने म्हटले की, याचिकेत सलमानच्या विरोधात काहीही नाही. त्यामुळे त्याला याचिकेत प्रतिवादी करण्याचे कोणतेही कारण नाही. तो आवश्यक पक्ष नाही. सलमानला पक्ष बनवणे म्हणजे मुख्य मुद्द्यावरून लक्ष हटवण्याप्रमाणे आहे. रिता देवी यांच्या मुलाच्या मृत्यूशी संबंधित प्रकरण याचिकाकर्त्यासाठी महत्त्वाचे आहे. ज्याचा आम्ही विचार करू', असं न्यायालयाने म्हटलं.
सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी अनुज थापन याला २६ एप्रिल रोजी पंजाब येथून अटक केली होती. मात्र अटक झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी अनुजचा मृतदेह पोलिस लॉकअपच्या शौचालयात आढळून आला. अनुज थापनने आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या आईने याचिकेद्वारे केला. याप्रकरणाची पुढील सुनावणी सहा आठवड्यानंतर ठेवण्यात आली आहे.