बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर दोन व्यक्तींकडून रविवारी(१४ एप्रिल) सकाळी हवेत गोळीबार करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणामुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी FIR दाखल करत पुढील कारवाई केली आहे. या प्रकरणानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री शिंदे सलमानच्या वांद्रे येथील निवासस्थानी त्याची भेट घेण्यासाठी गेले होते. शिंदेंनी सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. यावेळी सलमान खानचे वडील सलीम खानही उपस्थित होते. याचे फोटो एएनआयच्या ट्वीटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहेत. शिंदेंबरोबर झीशान सिद्दीकी आणि राहुल कनालही उपस्थित होते. याआधी मुख्यमंत्र्यांनी गोळीबार झाल्यानंतर सलमानला फोनही केला होता. या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेशही शिंदेंनी दिले होते.
"मी सलमान खानला भेटलो आणि त्याला सांगितलं की सरकार तुझ्यासोबत आहे. मी पोलिसांनाही याबाबत लगेच कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. हा महाराष्ट्र आहे. इथे गँगला थारा नाही. इथे गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. अटक केलेल्या दोघांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत. आपल्या माणसांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. मागच्या सरकारमध्ये काय झालं याबाबत मला बोलायचं नाही. पण, राज्यातील कोणत्याही व्यक्तीला त्रास देणाऱ्या गँगचा नायनाट केला जाईल", असं शिंदे यावेळी म्हणाले.
दरम्यान, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. २४ वर्षीय विक्की साहब गुप्ता आणि २१ वर्षीय सागर जोंगेंद्र पाल अशी त्यांची नावे आहेत. काल रात्री १ वाजता गुजरातच्या कच्छमधील भूज येथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.