अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नवा खुलासा केला आहे. गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पेजचा आयपी एड्रेस कॅनडाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याच्या काही तासांनंतर, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने एका फेसबुक ऑनलाइन पोस्टमध्ये घटनेची जबाबदारी घेतली आणि हा 'ट्रेलर' असल्याचं सांगून इशारा दिला. तपास यंत्रणेशी संबंधित सूत्रांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, या प्रकरणाचा कट अमेरिकेत रचला गेला होता. जवळपास एक महिन्यापासून याचं प्लॅनिंग सुरू होतं.
रविवारी (14 एप्रिल 2024) मुंबईत अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन शूटर्सनी गोळीबार केला होता. यानंतर दोघेही पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याच दरम्यान, त्यामध्ये विशाल राहुल उर्फ कालूचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
कोण आहे विशाल राहुल उर्फ कालू?
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारा विशाल राहुल उर्फ कालू हा गुरुग्रामचा रहिवासी असल्याचें पोलिसांच्या समोर आलं आहे. कालूने दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमकी दिली होती आणि त्याने माफी मागावी अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असे म्हटले होते. याआधीही सलमान खानला जून 2022 मध्ये एका लेटरद्वारे धमकी देण्यात आली होती.
वांद्रे पोलिसांनी सांगितलं की, एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पहाटे पाचच्या सुमारास वांद्रे परिसरातील गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर दोन जणांनी चार गोळ्या झाडल्या आणि पळ काढला. यानंतर सलमान खान यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.