बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर १४ एप्रिलला हवेत गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं होतं. गँगस्टर बिश्नोई गँगशी या प्रकरणाचा संबंध असल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. सलमानच्या घराबाहेर गोळीबारानंतर परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर सलमानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. आता राखी सावंतने याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केला आहे.
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कायमच चर्चेत असते. सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणावरुन राखीने आता प्रतिक्रिया दिली आहे. दुबईहून मुंबईत परतलेल्या राखीने नरेंद्र मोदींना सलमानच्या सुरक्षेसाठी विनंती केली आहे. राखी म्हणाली, "जेव्हा मला गोळीबारच्या घटनेबाबत माहिती मिळाली तेव्हा मी मुंबईला होते. मी तेव्हा खूप रडले. कोहिनूरपेक्षाही सलमान खान आपल्या देशासाठी महत्त्वाचा आहे. आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी त्याची गरज आहे."
ती पुढे म्हणाली, "सलमान खान गरीबांचा मसीहा आहे. सलमान खानने कधीच बाल्कनीमध्ये येऊ नये, अशी मी हात जोडून त्यांना विनंती करते. चाहत्यांसाठी त्यांनी एक मोठं हॉटेल बुक करावं. तिथे सुरक्षा पण असेल. आणि त्याला चाहत्यांनाही भेटता येईल."
"सलमान खान सुरक्षित राहिला पाहिजे. मोदीजी कृपया सलमान खानला झेड क्लास, एक्स क्लास आणि जेवढ्या पण सुरक्षा असतील सगळ्या द्या. कोणतंही कारण नसताना तुम्ही कंगनाला एवढी सुरक्षा दिली आहे. मला वाटतं सलमान खानला जास्त सुरक्षा पुरवली गेली पाहिजे. तो बॉलिवूडचा दिग्गज आहे," असं म्हणत राखीने थेट पंतप्रधान मोदींना सलमानच्या सुरक्षेसाठी विनंती केली आहे.