Join us

Salman House Firing: सलमानला घाबरवण्यासाठी रचला कट! बिश्नोईने दिले १ लाख आणि...; पोलीस तपासात उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 11:08 AM

सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली होती. या दोघांनाही १० दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. 

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्याची घटना रविवारी(१४ एप्रिल) घडली. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली होती. विक्की गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या दोघांनाही १० दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. 

सलमानला घाबरवण्यासाठी हा कट रचल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. सलमानला घाबरवणं हा यामागचा मुख्य हेतू असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. कमीत कमी दोन मॅगझीन म्हणजे १५-२० गोळ्या झाडण्याचे आदेश अनमोल बिश्नोईने दिल्याचंही समोर आलं आहे. यासाठी आरोपींना चांगल्या प्रतीचं पिस्तुलही देण्यात आलं होतं. तसंच यासाठी त्यांना १ लाख रुपये देण्यात आले होते, हे प्राथमिक तपासात उघड झालं आहे. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. त्यामुळे यामध्ये बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. अनमोल बिश्नोई हा संपूर्ण प्रकरणातील फरार आरोपी आहे. या संपूर्ण प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून काही सुचना दिल्या होत्या का? त्याचा यात सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. 

दरम्यान, सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खान कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्याबरोबरच राज ठाकरेही त्याच्या भेटीला गेले होते. बिश्नोई गँगकडून सलमानला याआधीही अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.  

टॅग्स :सलमान खानगोळीबारमुंबई पोलीस