सलमान खानच्या चाहत्यांसाठी हे वर्ष चांगलेच खास आहे. यंदा सलमानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘भारत’ प्रदर्शित होणार आहे. शिवाय वर्षाअखेर भाईजानचा ‘दबंग 3’ हा चित्रपटही चित्रपटगृहांत झळकणार आहे. ‘भारत’चा टीजर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना आता भाईजानच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, ‘भारत’ आणि ‘दबंग 3’चे शूटींग संपताच सलमान खानरोहित शेट्टीच्या चित्रपटात बिझी होणार आहे. होय, हे खरे आहे.
रोहितने रणवीर सिंगसोबत पहिल्यांदा काम केले. रोहित व रणवीरचा ‘सिम्बा’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. यानंतर रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी अक्षय कुमारला साईन केले. रोहित व अक्षयची जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करत आहेत. आता रोहितने सलमानसोबत हातमिळवणी केली आहे. म्हणजे रोहित शेट्टीच्या चित्रपटात प्रथमच सलमान झळकणार आहे. विशेष म्हणजे रोहित व सलमानचा हा आगामी चित्रपट एक कॉप ड्रामा आहे. या चित्रपटातही नेहमीप्रमाणे धमाकेदार अॅक्शन सीन्स असणार आहेत.
सलमानचा खास मित्र साजिद नाडियाडवाला हा चित्रपट प्रोड्यूस करतोय. गेल्या अनेक दिवसांपासून साजिद या चित्रपटाच्या स्टोरीवर काम करत होता. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, साजिद आणि रोहित या दोघांनाही या चित्रपटासाठी सलमानचं हवा होता. अखेर तो योग जुळून आला. ‘किक’ या चित्रपटातील देवी लाल सिंह अर्थात डेव्हिल हे पात्र चित्रपटाअखेर पोलिस वर्दीत दिसतो. साजिद व रोहित आपल्या नव्या चित्रपटाची कथा याच पात्राशी जोडू इच्छितात. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल आणि २०२० च्या अखेरिस तो रिलीज होईल, असे कळतेय.भाईजानचे चाहते ही बातमी ऐकून नक्की उत्साहित होतील. तुम्ही किती उत्साहित आहात, ते नक्की कळवा.