सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या 'टायगर 3' या आगामी सिनेमाचं चित्रिकरण मुंबईत 8 मार्चपासून सुरू होत आहे. या सिनेमातील प्रमुख कलाकारांनी वायआरएफमध्ये चित्रिकरण सुरू करण्याआधी पूजा केली. कोणत्याही सिनेमाचं काम सुरू होण्यापूर्वी अशी पूजा करण्याची पद्धतच वायआरएफमध्ये आहे. दिग्दर्शक मनीष शर्मा या ख्यातनाम फ्रँचाईझीमधील या सिनेमाची धुरा सांभाळत आहे. त्यानेही या पूजेसाठी हजेरी लावली. शिवाय, या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत असलेला इमरान हाश्मीही पूजेसाठी आला होता.
येथे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सुत्राने सांगितले, "सलमानखान पठाण या सिनेमाच्या चित्रिकरणासाठी काल शाहरुख खानसोबत वायआरएफमध्ये आला होता. भारतीय सिनेमातील सर्वात भव्य स्पाय फ्रँचाईझी वायआरएफ बनवत आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच. आता एसआरके आणि सलमान एकमेकांच्या सिनेमात झळकणार आहेत. सलमान स्टुडिओमध्ये येणारच होता. त्यामुळे टीमने त्याच दिवशी पूजा ठेवली आणि कतरिनालाही बोलावलं. मनीष आणि इमरान हाश्मीही पूजेसाठी उपस्थित होते."
सुत्राने सांगितले, "आपल्या 50 व्या वर्षपूर्तीनिमित्त वायआरएफ भारतीय सिनेसृष्टी किंवा बॉलिवुडच्या इतिहासातील सर्वात मोठा सिनेमा बनवत आहे. टायगर 3 हा अत्यंत भव्य आणि अभूतपूर्व सिनेमा असणार आहे आणि पठाणसुद्धा. हे सिनेमे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतील तेव्हा प्रेक्षकांसाठी दृश्यात्मक आणि मनोरंजनात्मक असा हा मोठा सोहळाच असणार आहे. या सिनेमांची ही ऊर्जा पूजेदरम्यानही दिसून आली. टायगर फ्रँचाईझीची ही कथा पुढे नेण्यास सगळेच कलाकार उत्सुक आहेत. सलमान पठाणच्या चित्रिकरणासाठी जाण्यापूर्वी या सगळ्यांनी छान तासभर एकमेकांसोबत घालवला."