Join us

'सिकंदर' सलमान खानचं 'किक' फोटोशूट! भाईजानने हटके पद्धतीने केली 'Kick 2'ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 12:53 IST

१० वर्षांपूर्वी २०१४ साली सलमानचा 'किक' रिलीज झाला होता.

'दबंग' अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या आगामी 'सिकंदर' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या सेटवरुन सलमानने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. त्याने 'किक २' (Kick 2) सिनेमाची नुकतीच घोषणा केली आहे. निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी सलमानचं कँडिड फोटोशूट शेअर करत ही घोषणा केली. यामध्ये सलमान खानची जबरदस्त बॉडी, कमालीचा फिटनेस दिसून येत आहे.

'किक' या सलमानच्या सुपरहिट सिनेमाच्या सीक्वेलची सर्वांनाच उत्सुकता होती. १० वर्षांपूर्वी २०१४ साली 'किक' रिलीज झाला होता. साजिद नाडियादवाला यांनी सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. या सिनेमात सलमान खानने दुहेरी भूमिका साकारली होती. तसंच जॅकलीन फर्नांडिससोबत त्याची जोडी जमली होती. नवाजुद्दीन सिद्दीकीने सिनेमात खलनायकाचं पात्र साकारलं. आता 'किक 2' ची घोषणा झाली आहे. सलमान खानचा पाठमोरा फोटो शेअर करत साजिद नाडियादवाला यांनी पोस्ट केली आहे. ते लिहितात, 'सिकंदर, हे खूपच अप्रतिम किक २ फोटोशूट होतं.'

सलमानचा हा फोटो पाहून चाहते अक्षरश: उत्साहित झाले आहेत. भाईजानचा सिकंदर, किक २, 'टायगर व्हर्सेस पठाण' आणि अॅटलीसोबतचा सिनेमा रांगेत आहे. सलमानच्या जबरदस्त कमबॅकसाठी चाहते आतुर आहेत.

'सिकंदर' पुढील वर्षी ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. यामध्ये सलमानसोबत रश्मिका मंदाना आणि काजल अग्रवाल या साऊथ सुंदरी आहेत. तर प्रतिक बब्बर व्हिलनच्या भूमिकेत आहे. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसाजिद नाडियाडवाला