बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) जीवाला धोका निर्माण झाला आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून त्याला अनेकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याहून पुढे जात काल पहाटे बांद्रा येथील त्याच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर चार गोळ्या झाडल्या गेल्या. या घटनेनंतर परिसरातील वातावरण तापलेलं आहे. सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून दुचाकीवरुन आलेल्या दोन गुंडांचा शोध घेतला जात आहे. या सर्व घटनेमुळे सलमानचे चाहते टेन्शनमध्ये आले आहेत. पण सलमान खान कोट्यवधी रुपयांचा मालक असूनही बांद्रातील एका छोट्या 1BHK अपार्टमेंटमध्ये का राहतो? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.
2009 साली सलमान खानने फराह खानच्या 'तेरे मेरे बीच मे' या टीव्ही शोमध्ये याचा खुलासा केला होता. या शोच्या एका एपिसोडमध्ये सलमान खानने एन्ट्री घेतली. फराहने त्याला 1BHK अपार्टमेंटमध्ये राहण्याचं कारण विचारलं. यावर तो म्हणाला, "आम्ही भावंडं लहानाचे मोठे होताना आईवडिलांच्या जवळ जाऊन झोपायचो. त्या दोघांची इतकी सवय झाली आहे की गॅलक्सीसोडून जाण्याची इच्छाच होत नाही."
बांद्रा येथील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान वरच्या मजल्यावर राहतो. तर खालच्या मजल्यावर त्याचे आईवडील राहतात. सलमानचे भाऊ अरबाज आणि सोहेल काही वर्षांपूर्वीच वेगळे झाले होते. शिवाय सलमान खानचं पनवेलमध्ये आलिशान फार्महाऊस आहे. तिथेही तो अनेकदा निवांत राहण्यासाठी जातो.
काल नक्की काय घडलं?सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर काल पहाटे ४ च्या सुमारास गोळ्या झाडल्या गेल्या. दुचाकीवर आलेल्या दोन गुंडांचा सध्या शोध घेतला जात आहे. सीसीटीव्हीत त्यांचे चेहरेही दिसले आहेत. या गुंडांनी माऊंट मेरी चर्चच्या इथे दुचाकी सोडली आणि ते बांद्रा स्टेशनला गेले. तिथून ते सांताक्रुझ स्टेशनवर उतरले. यानंतर ते कुठे गेले याचा पोलिसांना पत्ता लागलेला नाही. या घटनेनंतर राज ठाकरेंसह अनेकांनी सलमान खानच्या घरी जात त्याची भेट घेतली