Join us

एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 10:32 AM

बिष्णोई समाजाची अट मान्य करेल का सलमान खान?

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) आणि त्याची गँग दबंग अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) हात धुवून मागे लागली आहे. १९९८ साली केलेल्या काळवीट शिकारप्रकरणी त्यांनी सलमानला अजूनही माफ केलेले नाही. काही दिवसांपूर्वीच सलमानच्या बांद्रा येथील गॅलक्सी या राहत्या अपार्टमेंटवर गोळ्या झाडण्यात आल्या. यामागे लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिष्णोईचा हात असल्याचंही समोर आलं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान बिष्णोई समाज एका अटीवर सलमानला माफ करु शकतो असं समाजाच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे.

अखिल भारतीय बिष्णोई महासभाचे अध्यक्ष देवेंद्र बूडिया यांनी सांगितले की बिष्णोई समाज सलमानला माफ करण्यास तयार आहे. ते म्हणतात, "सोमी अलीने सलमानसाठी जी माफी मागितली आहे त्याचा काहीच उपयोग नाही. असं तर याआधी राखी सावंतनेही माफी मागितली होती. आरोपी खुद्द सलमान खाननेच जर माफीचा प्रस्ताव दिला तर त्याला मंदिरात यावं लागेल आणि जाहीर माफी मागावी लागेल. तरच समाज त्याला माफ करेल."

ते पुढे म्हणाले, "आमच्या २९ नियमांमध्ये एक नियम आहे क्षमादय हृदय. यात आमचे मोठमोठे महंत, साधु, नेतागण, बिष्णोई समाजाचे प्रमुख पंच आणि तरुण सर्व मिळून विचारविनिमय करुन सलमानला माफ करु शकतो. मात्र त्याला आमच्या समाजाच्या मंदिरासमोर यावं लागेल आणि शपथ घ्यावी लागेल की असा गुन्हा पुन्हा कधी करणार नाही. नेहमी पर्यावरणाचं आणि वन्यजीवांचं रक्षण करेल. जर असं झालं तर विचार करु शकतो."

सध्या सलमानचं यावर काहीच स्पष्टीकरण आलेलं  नाही. त्याला अजूनही बिष्णोई गँगचा धोका आहे. वेळोवेळी या गँगने त्याला धमकीही दिली आहे. थेट अपार्टमेंटवर गोळीबार झाल्याने आता सर्वच सावध झालेत. सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडकाळवीट शिकार प्रकरण