Join us  

चिमुकला जगनबीर कॅन्सरशी लढा जिंकला, सलमान खाननेही 5 वर्षांपूर्वी दिलेलं वचन केलं पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 11:02 AM

सलमान खानने काही दिवसांपूर्वी आपल्या ९ वर्षांच्या चाहत्याची भेट घेतली.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) दिलदार माणूस आहे याचा प्रत्यय अनेकदा आला  आहे. सलमानच्या मैत्रीचे, त्याच्या चांगुलपणाचे किस्से आपण अनेकदा ऐकले आहेत. लोकांच्या मदतीसाठी तो कायम पुढे असतो. नुकतंच सलमानने आपलं एक वचन निभावलं आहे. ९ वर्षांच्या कॅन्सरपीडित चिमुकल्याची भेट घेत त्याने आपल्या छोट्या चाहत्याला खूश केलं आहे. काय आहे हा नेमका किस्सा बघुया 

सलमान खानने काही दिवसांपूर्वी आपल्या ९ वर्षांच्या चाहत्याची भेट घेतली. जगनबीर असं या चिमुकल्याचं नाव आहे. किमोथेरपीच्या ९ राऊंडनंतर त्याने कॅन्सरला मात दिली. २०१८ साली मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सलमान खान पहिल्यांदा जगनबीरला भेटला होता. तेव्हा जगनबीर फक्त ४ वर्षांचा होता. ट्यूमरमुळे त्याची किमोथेरपी सुरु होती. कॅन्सरशी लढाई जिंकल्यानंतर मी तुला भेटेन असं सलमानने तेव्हा जगनबीरला वचन दिलं होतं. जेणेकरुन त्याला एक आशा मिळेल. गेल्या वर्षी जगनबीर कॅन्सरमुक्त झाला. आपलं वचन लक्षात ठेवून सलमानने बांद्रा येथील त्याच्या घरीच जगनबीरला बोलावलं आणि इतक्या वर्षांचं वचन पूर्ण केलं.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत जगनबीरची आई सुखबीर कौर म्हणाल्या,'जगनबीर ३ वर्षांचा असतानाच त्याच्या मेंदुत एका रुपयाएवढ्या आकाराचा ट्युमर आढळला. त्याची दृष्टी जायला लागली. या कठीण परिस्थितीचा सामना करताना डॉक्टरांनी दिल्ली किंवा मुंबईत उपचार घेण्याचा सल्ला दिला. वडील पुष्पिंदर यांनी जगनला मुंबईला आणले.'

एक दिवस हॉस्पिटलमध्ये असताना जगनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्याने सलमान खानला भेटायची इच्छा व्यक्त केली होती. हा व्हिडिओ सलमानपर्यंत पोहोचला होता. तेव्हा सलमानने हॉस्पिटलमध्ये येत जगनची भेट घेतली होती. तसंच कॅन्सरशी लढा जिंकल्यानंतर आपण परत भेटू असंही सलमान त्याला म्हणाला होता. आता तोच जगन एकदम ठणठणीत झाला आहे. त्याची 99 टक्के दृष्टीही परत आली आहे. तो आता शाळेतही जायला लागला आहे. 

टॅग्स :सलमान खानकर्करोगमुंबईसिनेमाबॉलिवूड