खान कुटुंब ही बॉलिवूडमधील लोकप्रिय फॅमिली आहे. नुकतंच सलमान खानची आई सलमा खान यांचा वाढदिवस झाला. खान कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात सलमा यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवशी खास बर्थडे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बर्थडे पार्टीतील काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. पण, एका व्हिडिओने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सलमा यांनी बर्थडे पार्टीत सलीम खान यांच्या दुसऱ्या पत्नी हेलन यांच्याबरोबर डान्स केला. फिटनेस कोच डिना पांडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सलमा आणि हेलन एकमेकांबरोबर डान्स करताना दिसत आहेत. दोघींच्याही चेहऱ्यावर आनंदी स्मितहास्यही दिसत आहे. सलमा यांच्या बर्थडे पार्टीतील हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
दरम्यान, सलमान खाननेही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानने शेअर केलेल्या व्हिडिओत सोहेल खान आपल्या आईबरोबर डान्स करताना दिसत आहे.
सलमा या सलीम खान यांच्या पहिल्या पत्नी आहेत. त्यांनी १९६४ साली लग्न करत संसार थाटला. त्यांनी सलमान, सोहेल, अरबाज, अर्पिता आणि अलविरा ही मुलं आहेत. सलमा यांच्याशी लग्ना केल्यानंतर सलीम खान हेलन यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी १९८१ मध्ये हेलन यांच्याशी दुसरा निकाह केला.