मुंबई-
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या गँगस्टर्सकडून सातत्यानं मोठे खुलासे होत आहेत. बिश्नोई गँगच्या गुंडाच्या चौकशीत आता बॉलीवूड अभिनेता सलमान खानविरोधातील कटाचीही माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या मानसा पोलिसांनी नुकतीच अटक केलेल्या गँगस्टर कपिल पंडीत यानं चौकशीत याबाबतची कबुली दिली आहे.
गँगस्टर कपिल पंडीतनं दिलेल्या जबाबानुसार सलमान खानला मारण्यासाठीचा पूर्ण प्लान जवळपास निश्चित झाला होता. पनवेल येथील सलमानच्या फार्महाऊस जवळच सुमारे दीड महिना सर्व गँगस्टर थांबले होते आणि संपूर्ण रेकी करण्यात आली होती. फार्म हाऊसच्या आतच सलमानला मारण्याचा प्लान आखला गेला होता. सलमानला ठार करण्याचा आदेशही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं दिला होता. पण सलमान भोवतीच्या कडक सुरक्षा व्यवस्थेनं प्लान यशस्वी होऊ शकला नाही.
शार्प शूटर दीपक मुंडीनंही केला खुलासादुसरीकडे, सिद्धू मुसेवाला हत्याकांडात पोलिसांनी पकडलेला शूटर दीपक मुंडी यानंही मुसेवाला खून प्रकरणासंदर्भात पंजाब पोलिसांच्या रिमांडदरम्यान अनेक खुलासे केले आहेत. सिद्धू मूसवाला हत्याकांडात राजस्थानचंही मोठं कनेक्शन समोर आलं आहे. दीपक मुंडीच्या चौकशीदरम्यान अनेक गुंडांची नावं समोर आली आहेत. शस्त्रास्त्रांपासून ते इतर मोठे कनेक्शनही समोर आले आहेत. पंजाब पोलिसांच्या तीन तुकड्याही मानसातून राजस्थानला रवाना झाल्या आहेत.
सलमान खानची झाली होती रेकीपंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी रविवारी माहिती दिली होती की, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील सहावा शूटर दीपक मुंडी याने बनावट पासपोर्टच्या मदतीनं दुबईला पळून जाण्याची योजना आखली होती. मुंडीचा सहकारी कपिल पंडितने बॉलीवूड अभिनेता सलमान खानला मारण्याची रणनीती आखण्यासाठी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून अभिनेत्याचा माग काढला होता. पंजाबी गायक मूसेवालाच्या हत्येनंतर तीन महिन्यांनंतर सहावा शूटर मुंडी आणि त्याच्या दोन साथीदारांना शनिवारी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील खरीबारी पोलीस स्टेशन क्षेत्रातील भारत-नेपाळ सीमा चौकीतून अटक करण्यात आली.