१९९३ साली रिलीज झालेला ‘बाजीगर’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. या चित्रपटात शाहरुख खानने साकारलेली खालनायकाची भूमिका आजही चाहते विसरलेले नाहीत. शाहरूख त्यावेळी इंडस्ट्रीत नवखा होता. ही निगेटीव्ह भूमिका साकारणं शाहरूखसाठी मोठं आव्हान होतं. पण त्याने ही भूमिका अगदी एकहाती पेलली. प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळे ‘बाजीगर’ हा चित्रपट शाहरुखच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. आता याच ‘बाजीगर’ सिनेमाबद्दल सलमान खानने मोठा खुलासा केला आहे.
होय, तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल पण ‘बाजीगर’ या सिनेमासाठी शाहरूख हा मेकर्सनी पहिली पसंत नव्हताच. सुरूवातीला या चित्रपटासाठी सलमानला विचारणा झाली होती. पण सलमानला भूमिका फारच निगेटीव्ह वाटली. त्याने चित्रपट साईन करण्याऐवजी मेकर्सला एक सल्ला दिला. एका मुलाखतीत सलमान यावर बोलला.
काय म्हणाला सलमान?तो म्हणाला, ‘बाजीगर’ हा सिनेमा मला ऑफर झाला होता. पण मला आणि माझ्या वडिलांना ऑफर झालेली भूमिका फारच निगेटीव्ह वाटली. कथेत आईचा थोडा इमोशनल टच असायला हवा, असा सल्ला मी दिग्दर्शक अब्बास मस्तान यांना दिला. पण तेव्हा त्यांनी माझा सल्ला धुडकावून लावला. त्यामुळे मी चित्रपट सोडला आणि शाहरूखने तो साईन केला. नंतर सलमान व सलीम खान म्हणत होते ते योग्य होतं, असं अब्बास मस्तान यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी राखी यांना साईन केलं आणि कथेत आईचा अँगल टाकला गेला. मला ‘बाजीगर’ आवडला होता. पण भूमिका फारच निगेटीव्ह असल्याने मी तो नाकारला होता. मी आईचा अँगल जोडण्याचा सल्ला दिल्यावर अब्बास मस्तान माझ्यावर हसले होते. पण नंतर त्यांनी माझाच सल्ला मानला. चित्रपट पूर्ण झाल्यावर त्यांनी मला फोन करून तुझी आयडिया आम्ही चित्रपटात वापरल्याचं सांगितलं होतं.
मैंने बाजीगर की होती तो...२००७ मध्ये इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीतही सलमान यावर बोलला होता. ‘बाजीगर’ हा सिनेमा मी सोडला आणि शाहरूखने साईन केला, याचं मला अजिबात दु:ख नाही. मला शाहरूखच्या यशाबद्दल मला मुळीच तक्रार नाही. थोडा विचार करा, मी बाजीगर केला असता तर आज मन्नत उभं नसतं. जरा सोचिए, अगर मैंने बाजीगर की होती तो आज बैंडस्टैंड में मन्नत खड़ा नहीं होता। शाहरूखला मिळालेल्या यशाचा मला आनंद आहे, असं सलमान म्हणाला होता.