Join us  

कास्टिंगच्या नावावर मोठा स्कॅम; सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसने केलं अलर्ट, सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 4:54 PM

Salman Khan : सलमानच्या टीमकडून असा अलर्ट मेसेज देण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही कंपनीने सलमानच्या नावाने फेक कॉल करणाऱ्यांवर कारवाई केली होती आणि लोकांना सावध केलं होतं.

सलमान खानचं प्रोडक्शन हाऊस सलमान खान फिल्म्स (SKF) ने एक स्टेटमेंट जारी करून अभिनेते आणि अभिनेत्रींना येणाऱ्या बनावट कॉल्सबद्दल सतर्क केलं आहे. सध्या ते कोणत्याही चित्रपटासाठी कास्टिंग करत नसल्याचं प्रॉडक्शन हाऊसने स्पष्टपणे म्हटलं आहे. काही लोक संभ्रम पसरवत आहेत. अशा लोकांवर कडक कारवाई करण्याबाबत देखील भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 

सध्या कोणत्याही चित्रपटासाठी कास्टिंग करत नाही. अशी अनेक प्रकरणं प्रोडक्शन हाऊसच्या माहितीत आली जिथे लोकांना SKF च्या बॅनरखाली बनवलेल्या चित्रपटासाठी कास्ट करण्याबाबत सांगितलं होतं. या कास्टिंगमध्ये सलमान खानच्या नावाचाही वापर करण्यात आला होता. अभिनेत्याचं नाव खराब होऊ नये यासाठी टीमने ट्विटरवर लोकांना सतर्क केलं आहे.

प्रोडक्शन टीमने केलेल्या पोस्टनुसार, "हे स्पष्ट करूया की सलमान खान किंवा सलमान खान फिल्म्स सध्या कोणतंही कास्टिंग करत नाहीत. आम्ही आमच्या भविष्यातील कोणत्याही चित्रपटासाठी कोणत्याही कास्टिंग एजंटची नियुक्ती केलेली नाही. तुम्हाला या संबंधित कोणताही ईमेल किंवा मेसेज आला तर विश्वास ठेवू नका. जो कोणी SKF किंवा सलमान खानचं नाव चुकीच्या पद्धतीने वापरत असल्याचं आढळलं तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."

सलमानच्या टीमकडून असा अलर्ट मेसेज देण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही कंपनीने सलमानच्या नावाने फेक कॉल करणाऱ्यांवर कारवाई केली होती आणि लोकांना सावध केलं होतं. सलमान खानच्या बॅनरखाली अनेक हिट सिनेमे बनले आहेत. यामध्ये बजरंगी भाईजान, दबंग, हिरो, ट्यूबलाइट, नोटबुक, लवयात्री, भारत, कागज, राधे, अंतिम आणि किसी की भाई किसी की जान यांचा समावेश आहे. 

टॅग्स :सलमान खान