Join us  

"मला आणि माझ्या कुटुंबीयांना संपवण्याचा बिश्नोईचा प्लॅन होता", सलमानचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 4:36 PM

कुटुंब धोक्यात...! लॉरेंसनं गँगसोबत आखलं होतं कटकारस्थान, मला मारायचा होता प्लॅन; पोलिसांत बोलला सलमान खान

Salman Khan Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर १४ एप्रिलला गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली होती. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनेच हा कट रचल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं. सलमान खानला घाबरवण्यासाठी हा कट रचल्याची कबुली आरोपींनी दिली होती. या प्रकरणानंतर सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. सलमान खानचा जबाबही या प्रकरणात नोंदविण्यात आला होता. 

आज तकने दिलेल्या रिपोर्टनुसार, सलमान खानच्या घरावरील फायरिंग प्रकरणात मुंबई पोलीस क्राइम ब्रांचकडून चार्जशीट दाखल करण्यात आली होती. यामध्ये सलमानने पोलिसांनी दिलेल्या माहितीचाही समावेश करण्यात आला होता. ही घटना घडली तेव्हा सलमान कुठे होता? तो काय करत होता? याबाबत अभिनेत्याने ४ जूनला पोलिसांकडे जबाब नोंदविला होता. त्याबाबत आता माहिती समोर आली आहे. 

सलमानने पोलिसांना काय सांगितलं? 

"मी एक फिल्म स्टार आहे. आणि गेल्या ३५ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. वांद्रेमधील बँडस्टँड जवळ असलेल्या माझ्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर अनेक चाहते गर्दी करतात. चाहत्यांप्रती असलेलं माझं प्रेम व्यक्त करण्यासाठी मी घराच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत येऊन त्यांना हात दाखवतो. जेव्हा जेव्हा माझ्या घरात पार्टी असते, माझे मित्र मैत्रिणी घरी येतात...तेव्हा मी याच बाल्कनीमध्ये बसून त्यांच्याबरोबर वेळ घालवतो. सकाळी उठल्यावर किंवा काम झाल्यानंतर मी बाल्कनीत जात असतो. माझ्यासाठी मी प्रायव्हेट सिक्युरिटीदेखील ठेवली आहे. 

२०२२ मध्ये माझ्या वडिलांना एक धमकीचं पत्र मिळालं होतं. ज्यामध्ये मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत माझ्या वडिलांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये मला ऑफिशियल ईमेल आयडीवर एक धमकीवजा मेल आला होता. त्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईकडून मला आणि कुटुंबीयांना धमकी दिली गेली होती. या वर्षी जानेवारी महिन्यात दोन अज्ञात व्यक्ती माझ्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. याबाबत पनवेल पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ते दोन्ही आरोपी लॉरेन्स बिश्नोईच्या गावातील असल्याचं समोर आलं. या घटनांनंतर मी माझ्या कुटुंबीयांना आणि जवळच्या व्यक्तींना नेहमी सतर्क राहण्यास सांगितलं. मला मुंबई पोलिसांकडून Y+ सिक्युरिटी देण्यात आली आहे. 

१४ एप्रिलला मी गोळ्यांचे आवाज ऐकले. पोलीस बॉडीगार्डने सांगितलं की पहाटे ४.५५ वाजता दोन व्यक्ती बाईकवर आल्या आणि त्यांनी पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. याआधीही मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. लॉरेन्स बिश्नोईने सोशल मीडियावरुन या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे. लॉरेन्स बिश्नोईनेच हा हल्ला केल्याची मला खात्री आहे. 

माझ्या बॉडीगार्डकडून या घटनेबाबत १४ एप्रिलला FIR दाखल करण्यात आला होता. लॉरेन्स आणि त्याच्या भावाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. याआधी एका मुलाखतीत त्याने मला आणि कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिली होती. मला माहीत आहे की लॉरेन्स बिश्नोईनेच हा हल्ला घडवून आणला आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना संपवण्याचा त्याचा प्लॅन होता. त्यासाठीच त्याने हा कट रचला. 

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटीगोळीबार