Join us

सलमान खान मोदी सरकारच्या ‘या’ अभियानाचे समर्थन करण्यासाठी उतरणार रस्त्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 12:34 PM

बॉलिवूडचा दबंग सलमान खान लवकरच दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर बनविण्यात आलेल्या सायकल ट्रॅकवर सायकल चालविताना बघावयास मिळणार आहे. ई-सायकलला लोकप्रिय बनविण्यासाठी ...

बॉलिवूडचा दबंग सलमान खान लवकरच दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर बनविण्यात आलेल्या सायकल ट्रॅकवर सायकल चालविताना बघावयास मिळणार आहे. ई-सायकलला लोकप्रिय बनविण्यासाठी ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसॅडर असलेला सलमान खान यावेळी सुदृढ आरोग्यासाठी संदेश देणार आहे. ई-वाहनांवर भर देणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, सरकार सायकलला वाहतुकीसाठी एक आरोग्यदायी पर्याय म्हणून प्रोत्साहन देऊ इच्छिते. ई-सायकलचा वापर सामान्य सायकलच्या तुलनेत अधिकाधिक प्रवास करण्यासाठी केला जाऊ शकतो. मंत्री गडकरी यांनी पीटीआयला सांगितले की, ‘सलमानने या मुद्द्यावर माझ्याशी चर्चा केली. तो सध्या ई-सायकल बनविण्याच्या एका प्रोजेक्टवर कामही करीत आहे. त्यामुळे सलमान सर्वसामान्यांमध्ये याबाबत चांगल्या पद्धतीने जनजागृती करू शकतो.’ सूत्रानुसार, सलमान खानच्या ‘बीइंग ह्युमन फाउंडेशनच्या माध्यमातून ई-सायकल बनविण्याचा प्रोजेक्ट राबविला जात आहे. त्यासाठी ई-सायकल निर्मिती कंपन्यांशी फाउंडेशनच्या वतीने चर्चाही केली जात आहे. मंत्री गडकरी यांनी म्हटले की, दोन-तीन वर्षांपूर्वी जेव्हा मी पर्यावरणात अनुकूल इंधन निर्मितीवर चर्चा करण्यास सुरुवात केली, तेव्हा लोक मला वेडा समजायचे. मात्र आता लोकांमध्ये याविषयी जनजागृती होण्यास सुरुवात झाली आहे.पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, ‘पर्यावरण अनुकूलतेसाठी रस्त्यावर ई-वाहन आणणे माझे स्वप्न आहे. दरम्यान, सलमान या अभियानास जोडला गेल्याने याविषयी लोकांमध्ये जनजागृती होईल, यात शंका नाही. वास्तविक सलमानही सायकलप्रिय असून, बºयाचदा तो सायकलवर प्रवास करताना दिसला आहे. आता तो सरकारच्या या अभियानाशी जोडला जात असल्याने लोकांमध्ये सायकलप्रती सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल, यात शंका नाही.