अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) बांद्रा येथील गॅलक्सी निवासस्थानावर गोळीबार करणाऱ्या दोन गुंडांना गुजरातमधून अटक केली आहे. काल रात्री १ वाजता गुजरातच्या कच्छमधील भूज येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. २४ वर्षीय विक्की साहब गुप्ता आणि २१ वर्षीय सागर जोंगेंद्र पाल अशी त्यांची नावं असल्याचं समोर आलं आहे. विक्की हा हरियाणाचा असून जोगेंद्र पाल बिहारचा आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगसमधल्याच दोघांनी हा गोळीबार केल्याचं बोललं जात होतं. त्यातच लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्ट करत गोळीबाराची जबाबदारी घेतली. विक्की आणि जोगेंद्र दोघांनी गॅलक्सीवर गोळ्या झाडल्यानंतर माऊंट मेरी चर्चजवळ दुचाकी सोडली. नंतर दोघंही बांद्रा स्टेशनला गेले. तिथून सांताक्रुझला उतरले. रिपोर्टनुसार, अटकेवेळी हे दोघं गुजरातला भूजमधील एका मंदिरात लपले होते. अहमदाबाद पोलिसांनी लोकस इंटेलिजन्सच्या आधारावर दोघांना शोधून काढलं. यासाठी सीक्रेट ऑपरेशन चालवण्यात आलं होतं. नंतर त्यांना मुंबई पोलिसांना सोपवण्यात आलं. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. प्राथमिक चौकशीत समोर आले की, ज्या बंदुकीने त्यांनी गोळ्या झाडल्या ती बंदुक त्यांनी सूरतच्या नदीत फेकली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्रांच टीमने १५ पथक तयार केले होते. बिहार, राजस्थान आणि दिल्लीसह गुजरात येथे छापेमारी केली गेली. अटकेनंतर पोलिसांनी प्रेस नोट जारी करत दोन्ही शूटर्सना मंदिरातून ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं. नुकतंच या आरोपींना मुंबईत आणण्यात आलं आहे.
पोलिसांच्या रिपोर्टनुसार, हे दोन्ही शूटर्स महिनाभर आधीच मुंबईत आले होते. त्यांनी नवी मुंबईतील पनवेल येथे एक खोली भाड्याने घेतली होती. यानंतर दोघांनी रेकी केली आणि नंतर कृती केली. घटनास्थळाच्या १ किमी अंतरावरुन दुचाकी ताब्यात घेतली. ही दुचाकी रायगडच्या एका पत्त्यावर रजिस्टर होती. ही सेकंड हँड बाईक होती. दुचाकीच्या मालकाचीही चौकशी केली. नवी मुंबईतूनही दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं.